31.1 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरबिजनेससेन्सेक्सची पुन्हा एकदा ८० हजारांपार झेप

सेन्सेक्सची पुन्हा एकदा ८० हजारांपार झेप

पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य १३ पट!

Google News Follow

मार्च महिन्यात पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा भारतीय शेअर बाजारालाही बसल्या होत्या. एकेकाळी ८० हजारांच्या वर व्यवहार करणारा सेन्सेक्स घसरून मार्चअखेरीस ७१,९४८ अंकांपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर बाजाराने जोरदार पुनरागमन करत पुन्हा ८० हजारांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारतीय शेअर बाजाराने तेजीचा नवा इतिहास रचला आहे. शुक्रवारी बाजारात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सेन्सेक्सने ८०० हून अधिक अंकांची उसळी घेत ८० हजारांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. या तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ५०२ लाख कोटी रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. विशेष म्हणजे, भारतीय कंपन्यांचे हे बाजारमूल्य पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा तब्बल १३ पट अधिक आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा २०२५ मधील जीडीपी सुमारे ४०७ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ३८ लाख कोटी रुपये होता. त्याच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचे ५०२ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य भारतीय शेअर बाजाराची प्रचंड व्याप्ती आणि ताकद अधोरेखित करते. अर्थात, बाजारमूल्य आणि जीडीपी हे आर्थिक मोजमापाचे दोन वेगवेगळे निकष आहेत.

भारतीय शेअर बाजारातील या ऐतिहासिक तेजीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची वाढती खरेदी महत्त्वाची ठरली आहे. गेल्या पाच व्यवहार सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात तब्बल ३५ हजार ७८१ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, मागील व्यवहार सत्रातच त्यांनी १४ हजार ७९६ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. गेल्या सहा वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक ठरली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील वाढता विश्वास आणि देशांतर्गत कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण अधिक मजबूत झाले आहे.
हे ही वाचा:
मुंबईच्या लोकसंख्येचे गणित बदलतेय? हिंदू, मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन!

एलआयसीच्या नफ्यात २० टक्क्यांची भरारी

अमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांचे २.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान

विशेष म्हणजे, जगातील अनेक प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरणीचे वातावरण असताना भारतीय बाजाराने मात्र दमदार कामगिरी केली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांबाबत वाढलेली चिंता, कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संभाव्य निर्बंध आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे अमेरिकेतील नॅस्डॅक, दक्षिण कोरियातील कोस्पी आणि तैवानमधील ताइएक्स या निर्देशांकांमध्ये घसरण झाली. काही बाजारांमध्ये ही घसरण सहा टक्क्यांपर्यंत पोहोचली. मात्र, भारतीय बाजारात लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली. कंपन्यांचे मजबूत आर्थिक निकाल, उत्पन्नातील वाढ आणि आकर्षक मूल्यांकनामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. गेल्या पाच व्यवहार सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जवळपास सहा टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी कायम राहणे आणि कंपन्यांची आर्थिक कामगिरी अपेक्षेनुसार मजबूत राहणे बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ५०० लाख कोटींचा टप्पा पार करणारे बाजारमूल्य आणि सेन्सेक्सची ८० हजारांपार झेप ही भारतीय भांडवली बाजारासाठी मोठी उपलब्धी असली, तरी आगामी काळात ही तेजी कितपत टिकते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा