30 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरसंपादकीयभाग रहेमान भाग...

भाग रहेमान भाग…

Google News Follow

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवण्यात आली तेव्हा भारतातील अनेकांना गुदगुल्या होत होत्या. अनेकांना इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तशीच क्रांति होत असल्याची स्वप्ने पडू लागली. त्या क्रांतिचा सध्या बांगलादेशात कडेलोट होतो आहे. हसीना भारतात आश्रयाला आल्यापासून बांगलादेश सतत धगधगतोय. जनता पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. निवडणुकीनंतर सत्तेवर आलेले तारीक रेहमान यांना लवकरच हसीना यांच्यासारखा पळ काढावा लागणार असे चित्र आहे. बांगलादेशात जेन झी क्रांती घडवणारे क्रांतिकार सध्या रेहमान यांच्यावर डोळे वटारयात.

डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतणार अशी घोषणा शेख हसीना यांनी केली होती. त्या केव्हा परतणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु त्या आधीच तारीक रेहमान यांचे आसन डगमगू लागले आहे. बांगलादेशातील ६४ पैकी २८ जिल्हे धगधगतायत. नोव्हेंबर २०२६ च्या मध्यातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशातील तथाकथित जेन झी, रस्त्यावर उतरली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांना नेसत्या वस्त्रांनिशी पळ काढावा लागला. याला जेन झी क्रांतिचे नाव देण्यात आले. डाव्यांनी, लिब्रांडूंनी या क्रांतिचे खूप कौतूक केले, परंतु प्रत्यक्षात या क्रांतिमुळे बांगलादेशातील जनतेच्या पदरात काय पडले? या प्रश्नाचे उत्तर बेरोजगारी, गरीबी आणि अऱाजक हेच आहे. जे युवा नेते या क्रांतित सामील होते, त्यांनी काढलेल्या नॅशनल सिटीझन पार्टीच्या वाट्याला निवडणुकीत फक्त दोन जागा आल्या. ते नेते आता तारीक रेहमान यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती केली नाही, असा ठणाणा करतायत. घटने दुरुस्ती नको सुधारणा हवी अशी मागणी करतायत. जणू घटनेत सुधारणा करून देशात सुरू झालेले अराजक संपणार आहे.

बांगलादेश पेटलेला आहे. लोकांना आता लक्षात येते आहे की, हसीना यांच्या कार्यकाळात आपण सुखी होतो. दोन वेळची रोजी रोटी आपल्याला मिळत होती. त्यामुळे पुन्हा हसीना यांना बांगलादेशात आणण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. घायल हो, इस लिये घातक हो… हा धुरंधर सिनेमातील संवाद इथे तंतोतंत लागू पडतो आहे. हसीना नावाच्या बाई रेहमान यांच्यासाठी अत्यंत घातक बनल्या आहेत. जे ५ ऑगस्ट २०२४ रोजी हसीना यांच्या वाट्याला आले तेच रेहमान यांच्या नशीबी आले तर कोणालाही फार आश्चर्य वाटणार नाही. किस्मत की खुबी है वो हमेशा बदलती रहेती है. आता हसीना आणि रेहमान दोघांची किस्मत बदलणार आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानकडून पराभव, आता यूएईविरुद्ध ‘करो वा मरो’!

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

गरिबी कायम ठेवणारे मूलभूत अडथळे दूर करण्यात यश

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

७ ते १८ नोव्हेंबरदरम्यान देशभरात ७८ ठिकाणी देशी बॉम्बस्फोट झाल्याची नोंद आहे. ७४ वाहने जाळण्यात आली आहेत. त्यात १८ पोलिस वाहनांचा समावेश आहे. अवामी लीगच्या नेत्यांची सुमारे ३० घरे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे,  परंतु आगीच्या झळा आता बीएनपीच्या नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. चट्टोग्राममधील माजी मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावण्यात आली आहे. ग्रामीण बँका हा युनूस यांचा उपक्रम. या बॅंकांच्या ७२ शाखांमध्ये जाळपोळ किंवा जाळपोळीचे प्रयत्न झाले.

आश्चर्याची बाब म्हणजे बंदी घातलेल्या आवामी लीगचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतायत. सरकार हा उठाव निर्दयतेने मोडून काढणार हे ठाऊक असूनही लोक रस्त्यावर येत आहेत. हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. जे अवामी लीग समर्थक नाहीत त्यांना सुद्धा रस्त्यावर येणे भाग पडते आहे, कारण लाखो लोकांच्या रोजीरोटीवर संकट आलेले आहे. हसीना सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर बांगलादेशच्या अर्थकारणाला ग्रहण लागले आहे. तिथल्या अर्थतंत्राचा कणा असलेल्या वस्त्रोद्योगावर मोठे संकट आले आहे. निर्यातीत ८० टक्के वाटा असलेल्या या उद्योगाला कोणतेही भविष्य नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, कामगार असंतोष, वेतनवाढीचे आंदोलन आणि ऊर्जा संकटाचा मोठा फटका या उद्योगाला बसला आहे. बांगलादेश गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशन आणि वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२४ पासून आतापर्यंत बांगलादेशातील १४७ ते १५१ वस्त्रोद्योग आणि कापड कारखाने कायमस्वरूपी पूर्णपणे बंद पडले आहेत. कामगार आंदोलन, कच्च्या मालाचा तुटवडा, बँकिंग अडचणी आणि परदेशी ऑर्डर्स रद्द झाल्यामुळे अनेक कारखाने सध्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये किमान वेतनवाढीच्या आंदोलनामुळे आशुलिया, सावर, गाझीपूर, मिरपूर औद्योगिक पट्ट्यात मोठा उद्रेक झाला आहे. कामगार मासिक ३०,००० ते ३२,००० टका वेतनाची मागणी करती आहेत. बीजीएमईएने नोव्हेंबर २०२६ मध्ये जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या संपाचा आणि हिंसाचाराचा थेट फटका ३१७ कारखान्यांना बसला असून, त्यांचे सुमारे ४२८ दशलक्ष डॉलर्सचे सुमारे ३,६०० कोटी रुपये नुकसान झाले आहे. तसेच २५४ दशलक्ष डॉलर्सच्या परदेशी ऑर्डर्स भारत, व्हिएतनामकडे वळल्या आहेत.  आंदोलनाच्या तीव्रतेनुसार दररोज ५० ते १२१ कारखान्यांमधील उत्पादन तात्पुरते बंद ठेवावे लागत आहे. यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील संपाच्या तीव्र लाटेत ५०० हून अधिक कारखान्यांचे कामकाज विस्कळीत होऊन जवळपास १० लाख कामगारांचा रोजगार तात्पुरता थांबला होता. सत्तेवर येण्यापूर्वी रहेमान यांनी लोकांना मोठी स्वप्ने दाखवली होती. महागाई नियंत्रणात आणू, देशात आर्थिक स्थिरता आणू, कुटुंबांना अनुदानासाठी फॅमिली कार्ड, शेतकऱ्यांना फार्मर्स काढ, सुशिक्षितांना बेरोजगार भत्ता, थकीत कर्जांची वसूली, विदेशातील काळा पैसा परत आणू. गेल्या दहा महिन्यात यापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचे आश्वासनही हवेत विरले आहे. भारतासोबत बांगलादेशाच्या पथ्यावर पडणारा गंगा पाणी वाटप करार करण्याच्या दाव्याचेही आता विसर्जन झालेले आहे. सगळ्या आघाड्यांवर रहेमान अपयशी ठरले आहेत.

बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहमान यांनी “ सीमेपलीकडे पळून गेलेले, त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी कट रचत आहेत आणि हिंसाचार व हत्या करत आहेत.”  असे विधान करत देशातील हिंसाचारासाठी थेट भारताकडे बोट दाखवले आहे.

अवामी लीगने देशव्यापी बंदची हाक दिल्यानंतर आणि हसीना यांनी बांगलादेशात परत येण्यासाठी नवीन पासपोर्ट व राष्ट्रीय ओळखपत्रासाठी विनंती केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रहमान यांनी हे वक्तव्य केले. फक्त घोषणेचे यांची कढी पातळ झाली आहे. हसीना प्रत्यक्ष तिथे जातील तेव्हा काय होईल?

या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. त्यांनी स्पष्ट केले की बांगलादेशातील अंतर्गत घडामोडींवर भारत भाष्य करणार नाही; तसेच भारताच्या हितांचे रक्षण करत बांगलादेशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि भविष्याभिमुख संबंध ठेवण्याची भारताची भूमिका कायम आहे.

अर्थात भारताने रहेमान यांच्या विधानांना फार किंमत न देण्याचे धोरण ठेवले आहे. उत्तर तर दिले जात आहे, परंतु ते कृतीतून. डॉ. झायेद उर रहेमान हे तारीक रहेमान यांचे सल्लागार आहेत. सतत भारतविरोधी विधाने आणि लेखन करत असतात इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या बैठकीसाठी ते भारतात आले तेव्हा विमानतळावर त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली.  चौकशीमुळे वैतागलेला डॉ. झायेद मिळेल त्या विमानाने कोलंबो मार्गे ढाक्यात परतला. तुम्ही कायम भारताच्या वाकड्यात शिरणार, चीनच्या मांडीवर बसणार आणि भारताकडून चांगुलपणाची अपेक्षा कराल तर ते यापुढे शक्य नाही, असा स्पष्ट संदेश भारत देतो आहे. तुम्ही वाकड्यात शिरणार असाल तर आम्हीही वाकड्यात शिरू अ स्पष्ट संकेत भारताने दिले आहेत. हसीना यांना वाचवण्याचे काम भारताने केले. उदया तारीक रेहमान यांच्यावर तिच वेळ आली तर त्यांना कोण वाचवणार हा महत्वाचा प्रश्न आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा