32 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरस्पोर्ट्ससँडपेपरगेटचा पडदा पुन्हा उघडणार

सँडपेपरगेटचा पडदा पुन्हा उघडणार

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्वतंत्र समितीची नियुक्ती

Google News Follow

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला जगभरात मान खाली घालायला लावणाऱ्या सँडपेपरगेट प्रकरणाची आठ वर्षांनंतर पुन्हा चौकशी होणार आहे. २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाने त्यावेळी क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवली होती. आता या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम आणि त्यानंतर झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र समीक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी ज्येष्ठ अधिवक्त्या फियोना मॅकलिओड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुमारे सहा आठवडे चालणार असून त्यानंतर समिती आपला अहवाल आणि शिफारशी सादर करणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याच्या ‘सब्र’ या पुस्तकामुळे या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. २०१८ मधील चेंडू छेडछाड प्रकरणाची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती, असा दावा ख्वाजाने पुस्तकात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनाच शिक्षा का देण्यात आली, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. ख्वाजाच्या या खुलाशांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संपूर्ण घटनाक्रम पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या फियोना मॅकलिओड यांना संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या चौकशीचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्या २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहभागी असलेले खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ तसेच त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियामधील महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले अधिकारी आणि बोर्ड सदस्य यांच्याकडून माहिती घेणार आहेत. संबंधितांना आपले अनुभव आणि बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

या प्रक्रियेत सहभागी होणे ऐच्छिक असेल. खेळाडू आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट, ऑनलाइन बैठक किंवा लेखी निवेदनाद्वारे आपली बाजू मांडता येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार असून, चौकशीत सहभागी झालेल्यांवर पूर्वीच्या घटनांबाबत नव्याने कोणतीही कारवाई केली जाणार नाही. ही चौकशी कोणालाही पुन्हा दोषी ठरवण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड बून यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, २०१८ च्या दौऱ्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला कोणत्याही शिक्षेची भीती न बाळगता आपले अनुभव मांडता यावेत, हा या स्वतंत्र व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे. या घटनेचा संबंधित व्यक्तींवर झालेला परिणाम लक्षात घेता त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रक्रियेतून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जुन्या घटनांमधून शिकण्याची आणि अधिक पारदर्शकता आणण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

समितीचा सहा आठवड्यांचा आढावा पूर्ण झाल्यानंतर तिचा अहवाल क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाकडे सादर केला जाईल. त्यानंतर बोर्डाला आपली अधिकृत भूमिका आणि शिफारशींवर कोणती पावले उचलली जाणार आहेत, याची माहिती देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी असेल. संपूर्ण अहवाल आणि शिफारशी सार्वजनिक करण्यात येणार असल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील या गाजलेल्या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना पुन्हा उजाळा मिळण्याची शक्यता आहे.

२०१८ मधील सँडपेपरगेट प्रकरणाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा जगभरात डागाळली होती. आता आठ वर्षांनंतर होणाऱ्या या स्वतंत्र समीक्षेतून त्या काळातील निर्णयप्रक्रिया, जबाबदारी आणि कारवाईबाबत नेमके काय समोर येते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा