अदानी समूहाने ऊर्जा आणि वीज पारेषण क्षेत्रातील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने वायझॅग पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी अदानी एनर्जी सोल्युशन्सने आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडसोबत करार केला असून, १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता हा व्यवहार पूर्ण झाला.
वायझॅग पॉवर ट्रान्समिशन हा आंध्र प्रदेशातील महत्त्वाच्या वीज पारेषण प्रकल्पांपैकी एक असून, त्याचा संबंध सुमारे ₹८,५०० कोटींच्या ट्रान्समिशन प्रकल्पाशी आहे. भविष्यातील ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पांना आवश्यक वीजपुरवठा आणि पावर इंटिग्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व मोठे आहे. या प्रकल्पातून तब्बल ४,५०० मेगावॅटपर्यंतची अंदाजित वीज मागणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हे ही वाचा:
टीव्हीवरील जाहिरातींच्या मर्यादेला अखेर ब्रेक
एकाच फ्लाइट नंबरची दोन विमानं आमनेसामने; अमेरिकेत नेमके काय झाले?
राहुल गांधी, खर्गे यांची पुन्हा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाला दांडी
रिलायन्स–रोल्स रॉईसची मोठी ‘जेट इंजिन’ डील
वायझॅग पॉवर ट्रान्समिशन ही इलेक्ट्रिक युटिलिटी आणि ट्रान्समिशन सेवा पुरवणारी कंपनी असून, तिचे अधिकृत आणि पेड-अप शेअर कॅपिटल प्रत्येकी ₹५ लाख आहे. कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२६मध्ये झाली असून, भारतात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी तिची नोंदणी करण्यात आली. कंपनी नव्याने स्थापन झालेली असल्याने तिच्यासाठी मागील तीन वर्षांचा टर्नओव्हर इतिहास लागू होत नाही.
अदानी समूहाच्या ऊर्जा व्यवसायाच्या विस्ताराच्या दृष्टीने हे अधिग्रहण महत्त्वाचे मानले जात आहे. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि अक्षय ऊर्जेचा विस्तार होत असताना मजबूत वीज पारेषण नेटवर्कची गरजही वाढत आहे. त्यामुळे नव्या ऊर्जा प्रकल्पांना आवश्यक वीजपुरवठा आणि पारेषण व्यवस्था उभारण्यासाठी वायझॅग पॉवर ट्रान्समिशनची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
