चाकण एमआयडीसीमधील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे उद्योजकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंत्र्यांचा दौरा होणार असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा रात्रीच्या वेळी कामाला लागल्या आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासोबतच रस्त्यांच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्यांचीही डागडुजी करण्यात आली. त्यामुळे मंत्री येणार म्हटल्यावर प्रशासन जागं होतं, मग नागरिक आणि उद्योजकांच्या तक्रारींकडे यापूर्वी दुर्लक्ष का झालं, असा सवाल उपस्थित होत आहे.
चाकण एमआयडीसी हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असून येथे मोठ्या उद्योगांसोबतच अनेक लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून रस्त्यांची खराब अवस्था, अवजड वाहनांची मोठी वर्दळ, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजक त्रस्त आहेत. या समस्यांचा थेट परिणाम उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर होत असून मालवाहतूक आणि कर्मचाऱ्यांची ये-जा यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, चाकणमधील २० हून अधिक लघुउद्योगांनी स्थलांतराचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
उद्योग बाहेर जाण्याची ही परिस्थिती निर्माण झाल्याने चाकणमधील उद्योजकांमध्ये मोठी नाराजी आहे. उद्योगांचे स्थलांतर झाल्यास त्याचा फटका केवळ व्यावसायिक क्षेत्राला बसणार नाही, तर स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा:
बोरिवलीत प्रयोगशाळेत केली जात होती गांजाची लागवड
वाराणसी विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान अचानक गोळीबार
खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा दोन चिमुरडींसह मृत्यू
विमल जाहिरातीवर एफडीएचा दणका; शाहरुख, अजय, टायगरला नोटीस
दरम्यान, चाकण एमआयडीसीमधील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योगांच्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष यंत्रणाही उभारण्यात आली आहे. पुढील ९० दिवसांत आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या आधी रातोरात खड्डे बुजवण्याची झालेली लगबग आता चर्चेचा विषय ठरली आहे. कारण उद्योजकांना तात्पुरती डागडुजी नको, तर कायमस्वरूपी आणि दर्जेदार पायाभूत सुविधा हव्या आहेत. चाकण एमआयडीसीसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रातील रस्ते, वाहतूक आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमचा सुटणार का, तसेच उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार ठोस निर्णय घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
