भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबाच्या वृत्ताचे खंडन

पीयूष गोयल यांनी स्पष्ट केली भूमिका

भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबाच्या वृत्ताचे खंडन

भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये कोणताही अडथळा आलेला नसल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. भारताने अमेरिकााशी तातडीने व्यापार करार करण्यास नकार दिल्याचा दावा करणारे वृत्त “पूर्णपणे खोटे, निराधार आणि दिशाभूल करणारे” असल्याचे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.

सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टद्वारे गोयल यांनी या वृत्ताचे खंडन केले. त्यांनी सांगितले की, जून महिन्यात भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (USTR) जेमिसन ग्रीअर यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली होती. त्या बैठकीत दोन्ही देशांनी संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण आणि दोन्ही देशांतील उद्योग, शेतकरी, कामगार तसेच ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारा व्यापार करार करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला होता.

गोयल यांनी पुढे सांगितले की, भारत आणि अमेरिकेची वाटाघाटी करणारी पथके अजूनही सातत्याने चर्चेत सहभागी असून व्यापार करार अंतिम करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. त्यामुळे वाटाघाटी ठप्प झाल्या असल्याचा किंवा भारताने करार नाकारल्याचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

लॉटरी घोटाळा प्रकरणात फरार तृणमूलचे तीर्थंकर घोष अटकेत

अनुपम खेर यांनी नसिरुद्दीन शाह यांना झोडपले!

पवारांना मागे टाकत देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम!

डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला

यापूर्वी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालात भारताने घाईघाईने करार करण्याऐवजी अधिक अनुकूल अटी मिळवण्यासाठी भूमिका कठोर केल्याचा दावा करण्यात आला होता. विशेषतः कृषी क्षेत्र, आयात शुल्क आणि बाजारपेठेतील प्रवेश यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भारत तडजोड करण्यास तयार नसल्याचे त्या वृत्तात म्हटले होते.

दरम्यान, भारत सरकारची भूमिका स्पष्ट करताना पीयूष गोयल यांनी दोन्ही देशांसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरेल, असा समतोल व्यापार करार करण्यावर भर दिला आहे. सध्या आयात शुल्क, बाजारपेठेतील प्रवेश, कृषी क्षेत्र आणि विविध उद्योगांशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version