पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पानिहाटी विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार राहिलेले तीर्थंकर घोष यांना लॉटरी घोटाळा, खंडणी उकळणे आणि शस्त्राच्या धाकावर धमकावल्याप्रकरणी सोमवारी (१३ जुलै) अटक करण्यात आली. या प्रकरणात ते बराच काळ फरार होते. तीर्थंकर घोष हे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते निर्मल घोष यांचे पुत्र आहेत. ममता बॅनर्जी यांच्या मागील सरकारच्या काळात निर्मल घोष यांनी पश्चिम बंगाल विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे एका ठिकाणी छापा टाकून तीर्थंकर घोष यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना सोमवारी उत्तर २४ परगणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. सन २०२१ मध्ये पानिहाटी मतदारसंघातून निर्मल घोष सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या परिसरात झालेल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात त्यांचे आणि तीर्थंकर घोष यांचे नाव समोर आले होते.
हे ही वाचा:
अनुपम खेर यांनी नसिरुद्दीन शाह यांना झोडपले!
पवारांना मागे टाकत देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम!
डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला
तेल दरवाढीने पाकिस्तानची कोंडी; पेट्रोल, बस-रिक्षा, मालवाहतुकीचे दर वाढले
याशिवाय, स्थानिक वाहनचालकाने लॉटरीत जिंकलेली सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोपही निर्मल घोष आणि तीर्थंकर घोष यांच्यावर आहे. या प्रकरणात पोलिस त्यांचा शोध घेत होते; मात्र दोघेही फरार होते. दरम्यान, शनिवारी तृणमूल काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बैठकीत निर्मल घोष सहभागी झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नंतर ऋतब्रत बॅनर्जी यांनी निर्मल घोष आपल्या गटात सामील होण्याची शक्यता फेटाळून लावली.
अलीकडील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पानिहाटी मतदारसंघातून निर्मल घोष यांच्या जागी तीर्थंकर घोष यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या उमेदवार रत्ना देबनाथ यांनी त्यांचा २८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.







