भारताचा अधिकृत सुवर्णसाठा सातत्याने वाढत असून देशाकडे सध्या सुमारे ८८०.५२ टन सोन्याचा साठा आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. या साठ्यामुळे भारत अधिकृत सुवर्णसाठा बाळगणाऱ्या देशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशाच्या परकीय चलन साठ्याचा एक भाग म्हणून सोन्याचा साठा राखते. जागतिक आर्थिक अनिश्चितता, चलन बाजारातील चढ-उतार आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा साठा हा सुरक्षित मालमत्ता (Safe Asset) मानला जात असल्याने आरबीआयने गेल्या काही वर्षांत त्यात सातत्याने वाढ केली आहे.
हे ही वाचा:
प्रियांका वड्रा-शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जुंपली
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!
बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार कायम; सहा महिन्यांत २५७ घटनांची नोंद
राज्यसभेत सरकारने स्पष्ट केले की, आरबीआयच्या ताब्यातील सोने भारतात तसेच परदेशातील सुरक्षित तिजोरींमध्ये ठेवले जाते. यामुळे गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात आणि देशाच्या परकीय चलन साठ्याला अतिरिक्त स्थैर्य मिळते. जागतिक स्तरावर अनेक केंद्रीय बँका आपल्या सुवर्णसाठ्यात वाढ करत आहेत. डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, राखीव मालमत्तेत विविधता आणणे आणि आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षितता राखणे या उद्देशाने सोन्याची खरेदी वाढली आहे. भारतानेही याच धोरणाचा अवलंब केला असून सुवर्णसाठा हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा महत्त्वाचा आधार मानला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, मजबूत सुवर्णसाठ्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्याला अधिक बळ मिळते आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी करण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यातही आरबीआय बाजारातील परिस्थितीनुसार सुवर्णसाठ्याचे व्यवस्थापन करत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
