शेअर बाजारात जिओचा महास्फोट!

हजारो कोटींच्या इश्यूने बाजाराचे लक्ष वेधले

शेअर बाजारात जिओचा महास्फोट!

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ प्लॅटफॉर्म्सने अखेर आपल्या बहुचर्चित आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करत भारतीय भांडवली बाजारात मोठी खळबळ उडवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांत कंपनीने सेबीकडे कागदपत्रे सादर केली. जिओचा हा आयपीओ भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डीआरएचपीनुसार, हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू स्वरूपात असणार असून सुमारे २७ कोटी इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या इश्यूमध्ये कोणताही ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) घटक नसणार आहे. म्हणजेच विद्यमान गुंतवणूकदार आपले शेअर्स विकणार नाहीत, तर कंपनी नव्याने भांडवल उभारणार आहे. बाजारातील अंदाजानुसार या आयपीओद्वारे सुमारे ₹३०,००० कोटी ते ₹४०,००० कोटी निधी उभारला जाऊ शकतो, तर कंपनीचे मूल्यांकन ₹१० लाख कोटी ते ₹१५ लाख कोटींच्या दरम्यान असू शकते.
हे ही वाचा:
प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांविरोधात ढाकामध्ये हिंदू एकटवले

FATFच्या उपाध्यक्षपदी आयएएस अधिकारी विवेक अग्रवाल यांची निवड

नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र

नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले

या निधीचा मोठा हिस्सा रिलायन्स जिओ इन्फोकॉमवरील कर्जफेडीसाठी वापरला जाणार आहे. कंपनीने सुमारे ₹२७,५०० कोटींची रक्कम कर्ज परतफेडीसाठी राखून ठेवण्याची योजना आखली आहे. उर्वरित निधी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड सेवा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स आज केवळ दूरसंचार कंपनी राहिलेली नाही. मोबाईल सेवा, फायबर ब्रॉडबँड, एंटरप्राइज सोल्युशन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, डिजिटल अॅप्स आणि एआय यांसारख्या क्षेत्रांत कंपनीने मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचे ऑपरेशन्समधून उत्पन्न ₹१,४६,८८५ कोटींवर पोहोचले, तर निव्वळ नफा ₹३०,०४९ कोटींवर गेला. महसूल आणि नफा या दोन्ही आघाड्यांवर दुहेरी अंकातील वाढ नोंदवत जिओने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा सुमारे ६६ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. याशिवाय मेटा, गुगल, सिल्व्हर लेक, केकेआर, मुबाडाला आणि सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांनीही कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे जिओचा आयपीओ केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक गुंतवणूकदारांचेही लक्ष वेधून घेणार आहे.

मुकेश अंबानी यांनी हा क्षण रिलायन्स समूहासाठी अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, जिओची लिस्टिंग विद्यमान भागधारकांसाठी मोठे मूल्य निर्माण करेल आणि भारतातून जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्या उभ्या राहू शकतात हे पुन्हा सिद्ध करेल. सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिओ आयपीओच्या किंमतपट्टा, इश्यूची अंतिम रक्कम आणि सबस्क्रिप्शन तारखा जाहीर केल्या जातील. मात्र सध्याच या आयपीओने बाजारात प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून, तो भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चित आयपीओंपैकी एक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version