मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा मुंबई मंडळ येत्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल ८ हजार घरांची मेगा लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील हजारो कुटुंबांच्या गृहस्वप्नाला नवी आशा मिळाली आहे. यापूर्वी २,६४० घरांच्या लॉटरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता म्हाडाने आणखी मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीत विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) अशा सर्व श्रेणींतील नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ एकाच वर्गापुरती ही योजना मर्यादित न राहता सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत अनेकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यात अस्त्र, ब्राह्मोसचे काय आहे महत्त्व?
ओपेकचा मोठा निर्णय; तेलाचे दर कोसळण्याची चिन्हे!
FPIचा यू-टर्न! बँकिंग शेअर्समध्ये पैशांचा महापूर
भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास
म्हाडा प्रशासनाने गेल्या काही वर्षांत गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढवला असून, विविध विकास योजनांमधून उपलब्ध झालेली घरे या सोडतीत समाविष्ट केली जाणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर प्रदेशातील विविध ठिकाणी ही घरे उपलब्ध असतील. त्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी मुंबई परिसरात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या २,६४० घरांच्या लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये नव्या ८ हजार घरांच्या लॉटरीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, घरांचे दर, प्रकल्पांची ठिकाणे आणि वेळापत्रक याबाबतची सविस्तर माहिती म्हाडाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे. इच्छुक नागरिकांनी अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबईत घरांच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःचे घर घेणे सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक कठीण होत असताना, म्हाडाची ही मेगा लॉटरी लाखो कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण उपक्रमांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
