भारतातील ऍपल ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय मॅकबुक आणि आयपॅड मालिकेच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली असून काही प्रीमियम मॉडेल्सच्या किंमती तब्बल १ लाख रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. ही वाढ कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर लागू करण्यात आली असून नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कंटेंट क्रिएटर्स आणि ऍपल इकोसिस्टममध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या नव्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे, ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक यांनी काही दिवसांपूर्वीच जागतिक पुरवठा साखळीवरील वाढता दबाव आणि मेमरी घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे दरवाढ टाळणे अशक्य झाल्याचे संकेत दिले होते. त्या घोषणेनंतर अवघ्या काही दिवसांतच कंपनीने भारतासह अनेक बाजारपेठांमध्ये किंमती वाढवल्या आहेत.
कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय १३ इंच M5 मॅकबुक एअरची किंमत आता १,१९,९०० रुपयांवरून थेट १,४९,९०० रुपये झाली आहे. म्हणजेच अवघ्या काही आठवड्यांत ३० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १५ इंच मॅकबुक एअरची किंमत १,४४,९०० रुपयांवरून १,७९,९०० रुपये करण्यात आली असून या मॉडेलवर २५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, १४ इंच M5 मॅकबुक प्रो (16GB RAM) या मॉडेलच्या किंमतीत सर्वाधिक धक्कादायक वाढ पाहायला मिळाली आहे. लॉन्चवेळी १,६९,९०० रुपये असलेले हे मॉडेल आता २,३९,९०० रुपयांना विकले जात आहे. म्हणजेच ग्राहकांना आता ७० हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. याहूनही मोठी वाढ M5 Max व्हेरिएंटमध्ये करण्यात आली असून या प्रीमियम मॉडेलच्या किंमतीत तब्बल १ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कमी किंमतीतील ग्राहकांना लक्ष्य करत सादर करण्यात आलेल्या मॅकबुक निओलाही दरवाढीचा फटका बसला आहे. या मॉडेलची किंमत ६९,००० रुपयांवरून ७९,००० रुपये करण्यात आली असून त्यात १० हजार रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः विद्यार्थी आणि पहिल्यांदाच मॅकबुक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे मॉडेल आकर्षक पर्याय मानले जात होते. मात्र नव्या किंमतीमुळे या वर्गालाही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. फक्त मॅकबुकच नव्हे तर ॲपलने आपल्या आयपॅड मालिकेच्या किंमतींमध्येही मोठी वाढ केली आहे. ११ इंच M4 आयपॅड एअरची किंमत ६४,९०० रुपयांवरून ८९,९०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच या मॉडेलवर २५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे M5 चिप आणि 256GB स्टोरेज असलेला आयपॅड प्रो आता ९९,९९० रुपयांऐवजी १,३९,९०० रुपयांना उपलब्ध होणार असून या मॉडेलवर ३९,९१० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आम्ही युद्धात नव्हतो! अमेरिका-इराण संघर्षावरून मेलोनींनी नाटोला सुनावले
पियुष गोयल यांना Exceptional Leadership in Elevating UK-India Ties पुरस्कार
ओमानजवळ जहाजावर हल्ला; होर्मुझमधील स्थलांतर मोहीम तात्पुरती स्थगित
व्हेनेझुएलामध्ये भूकंपाचा महाविनाश! मृतांचा आकडा २३५ वर, १,५०० हून अधिक बेपत्ता
दरवाढ केवळ भारतापुरती मर्यादित नसून अमेरिकेतही ऍपलने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. अमेरिकेत iPad Airची सुरुवातीची किंमत ५९९ डॉलरवरून ७४९ डॉलर, तर iPad Proची किंमत ९९९ डॉलरवरून १,१९९ डॉलर करण्यात आली आहे. याशिवाय MacBook Neoची किंमत ५९९ डॉलरवरून ६९९ डॉलर, तर MacBook Airची किंमत १,०९९ डॉलरवरून १,२९९ डॉलर करण्यात आली आहे. १४ इंच MacBook Proची किंमतही १,६९९ डॉलरवरून १,९९९ डॉलर झाली आहे.
