टेस्लाने अखेर भारतीय बाजारपेठेत आपला दिमाखदार प्रवेश घोषित केला असून, आपल्या मॉडेल Y इलेक्ट्रिक कारची किंमत ₹६० लाखांपासून (अंदाजे ७० हजार डॉलर) सुरू केली आहे. कंपनीने आज मुंबईतील पहिले शोरूम अधिकृतपणे सुरू केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले.
मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) अपस्केल मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये हे आकर्षक नवीन शोरूम सुरू झाले आहे. जागतिक स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.
शोरूमच्या पांढऱ्या भिंतीवर काळ्या रंगात टेस्लाचे लोगो ठळकपणे झळकत होते, तर काचेमागे ठेवलेल्या मॉडेल Y ने अनेक जिज्ञासू लोकांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे इंग्रजीसोबतच देवनागरीतही टेस्लाचे नाव आकर्षणाचे केंद्र बनले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन प्रसंगी म्हटले की, महाराष्ट्राला टेस्लाने भारतात संशोधन व विकास आणि उत्पादन युनिट्स स्थापन करावीत, अशी इच्छा आहे. तसेच, त्यांनी टेस्लाला महाराष्ट्राला या प्रवासात भागीदार म्हणून विचार करण्याचे आमंत्रण दिले. “आपण संशोधन व विकास तसेच उत्पादन भारतात करावे, ही आमची इच्छा आहे. मला खात्री आहे की टेस्ला योग्य वेळी याचा विचार करेल,” असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई केवळ भारताची आर्थिक, व्यावसायिक व मनोरंजनाची राजधानी नाही, तर ती एक उद्यमशीलतेचा केंद्रबिंदू देखील आहे. “मुंबई ही नावीन्य आणि शाश्वततेचे प्रतीक आहे,” असे फडणवीस म्हणाले. टेस्ला ही केवळ एक कार कंपनी नाही. ती डिझाईन, नावीन्य व शाश्वततेचे प्रतीक आहे, म्हणूनच ती जगभरात प्रेमाने स्वीकारली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
‘विवादित वास्तूवर नरसिंह राव यांची भूमिका अस्पष्ट होती’
आईएसएमएची इथेनॉल आयात बंदी कायम ठेवण्याची मागणी
नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
भारताच्या सरासरी महागाई दरात ३ टक्क्यांची घट

भारतामध्ये टेस्ला गाड्यांच्या किमती कशा असतील?
टेस्ला सध्या भारतात मॉडेल Y चे दोन प्रकार ऑफर करत आहे:
-
रिअर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची किंमत ₹६०.१ लाख ($७० हजार)
-
लाँग-रेंज व्हेरिएंटची किंमत ₹६७.८ लाख ($७९ हजार)
या किमती इतर बाजारपेठांपेक्षा खूप जास्त आहेत. उदाहरणार्थ, अमेरिका (₹३८.६ लाख किंवा $४४,९९०), चीन (₹३०.५ लाख किंवा $३६,७००), आणि जर्मनी (₹४६ लाख किंवा €४५,९७०) — या किंमतींमध्ये मोठा फरक प्रामुख्याने भारतातील उच्च आयात शुल्कामुळे आहे.
जरी किंमती जास्त असल्या तरी, टेस्ला प्रामुख्याने भारतातील श्रीमंत शहरी ग्राहकांना लक्ष करत आहे, जिथे सध्या बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या जर्मन ब्रँड्स प्रिमियम EV विभागात आघाडीवर आहेत. भारत अजूनही पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांनी व्यापलेला आहे, मात्र EV सेक्टर हळूहळू वेग पकडत आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रासारखे स्थानिक उत्पादक या बदलाचे नेतृत्व करत आहेत.
भारताने २०३० पर्यंत एकूण कार विक्रीमध्ये EV चा वाटा 30% करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे सध्या फक्त 4% आहे. परकीय ऑटोमोबाईल उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी कर सवलती व प्रोत्साहने दिली जात आहेत.







