पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना संबोधित करताना २२ सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ‘जीएसटी बचत उत्सवा’ची घोषणा केली. यानुसार जीएसटी २.० कर बदल लागू झाले आहेत, ज्यामुळे वस्तू आणि सेवांवरील कर दरांमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. नव्या बदलांनुसार ५% आणि १८% असे दोन कर दर आहेत, तर अति-लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर ४०% कर आकारला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
जीएसटी २.० मध्ये दोन व्यापक स्लॅब देण्यात आले असून अन्नधान्य, औषधे, मूलभूत दुग्धजन्य पदार्थ आणि शैक्षणिक उत्पादने यासारख्या जीवनावश्यक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी ५% कर, तर उत्पादन, वाहतूक आणि ग्राहक सेवांसाठी १८% कर असणार आहे. तर तंबाखू, पान मसाला, वायूयुक्त पेये, प्रीमियम वाहने, जुगार, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि रेस क्लब यासारख्या वस्तूंवर ४०% दर लागू होईल. यामुळे अनेक आवश्यक आणि ग्राहक-केंद्रित वस्तूंवर आता कमी कर आकारला जाईल.
दूध, चपाती, पराठा आणि पराठा करमुक्त असतील. बटर, तूप, पनीर आणि चीज सारख्या उत्पादनांवर ५% कर आकारला जाईल. पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, कॉर्नफ्लेक्स, नमकीन आणि भुजिया सारख्या पॅकेज केलेल्या पदार्थांवरही ५% कर आकारला जाईल. बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यावर पूर्वी १२% कर होता, आता ५% कर आकारला जाईल. रिफाइंड साखर आणि मिठाई देखील ५% कर श्रेणीत येतील. औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पुस्तके करमुक्त असतील किंवा ५% दराने कर आकारला जाईल. ३५० सीसी पर्यंत इंजिन असलेल्या छोट्या कार आणि बाईकवर २८% ऐवजी १८% कर आकारला जाईल. जीवन आणि आरोग्यावरील विमा पॉलिसी आता करमुक्त असतील. खते, बियाणे, पीक निविष्ठा आणि बांधकाम साहित्य १२% वरून ५% पर्यंत कर लावला जाईल. सेवांमध्ये ७,५०० रुपयांपेक्षा कमी असलेल्या हॉटेलच्या तिकिटांवर आता १२% ऐवजी ५% कर आकारला जाईल. इकॉनॉमी विमान तिकिटांवरही ५% कर आकारला जाईल.
हे ही वाचा:
११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जीएसटी बचत उत्सवाची घोषणा’
नोएडा विमानतळावरून लवकरच कमर्शियल उड्डाणे
“राहुल गांधी पप्पू आहेत आणि पप्पूसारखेच बोलतात”
सिगारेट, गुटखा, जर्दा, पान मसाला आणि साखरेसह वायूयुक्त पाण्यावर आता ४०% कर आकारला जाईल. कोळशावर आधारित उद्योगांचा खर्च वाढल्याने ५% वरून १८% पर्यंत वाढ झाली. ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक आणि लक्झरी कारवर ४०% कर आकारला जाईल. कॅसिनो, घोड्यांच्या शर्यती, लॉटरी आणि आयपीएल तिकिटे देखील ४०% च्या श्रेणीत येतील.







