गोव्याच्या अरपोरा येथील नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली, ज्यात २५ जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की नाइटक्लबने अग्निसुरक्षेचे नियम योग्य प्रकारे पाळले नव्हते, ज्यामुळे परिस्थिती आणखी भीषण बनली.
गोवा पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये ४ पर्यटक, १४ नाइटक्लब कर्मचारी यांचा समावेश आहे, तर ७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. याशिवाय सहा जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित होते आणि संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “आजचा दिवस गोव्याकरिता अत्यंत दुःखद आहे. मी अत्यंत व्यथित आहे आणि या क्षणी सर्व पीडित कुटुंबीयांप्रती माझ्या गहन संवेदना व्यक्त करतो.” तसेच या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अग्निसुरक्षेचे नियम आणि इमारत बांधकामाचे नियम पाळले गेले होते का, हे तपासले जाईल. जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाकडे कठोरपणे पाहिले जाईल.
नाइटक्लबचे सुरक्षा रक्षक संजय कुमार गुप्ता यांनी सांगितले की, दुर्घटना रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान घडली.
“त्या वेळी डीजे आणि डान्सरचा कार्यक्रम होणार असल्याने क्लबमध्ये गर्दी खूप होती. अचानक आग लागली आणि गोंधळ उडाला,” असे त्यांनी सांगितले.
एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, त्याने मोठा स्फोट ऐकला होता आणि घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थिती अत्यंत भयानक होती. दुसऱ्या एका सुरक्षा रक्षकाने पुष्टी केली की आग सिलेंडरच्या स्फोटानंतरच पसरली. घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की बहुतांश मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. अनेक कर्मचारी थेट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
भारताचा आफ्रिकेवर ‘यशस्वी’ मालिकाविजय!
निलंबित तृणमूल आमदार हमायून कबीरने बाबरी मशीदीची वीट रचली
यशस्वीची किमया! तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा सहावा भारतीय
कामानंतर फोन, ईमेल नको! डिस्कनेक्ट करण्याचा अधिकार विधेयक सादर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त केले आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.







