कुख्यात लॉरेंस बिश्नोई गँगने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या व्हॉइस नोटमध्ये लॉरेंस बिश्नोईचे नाव घेत रणवीर सिंगकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
या धमकीनंतर रणवीर सिंगने तात्काळ मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी रणवीर सिंग यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानाबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. घराच्या परिसरात सतत नजर ठेवण्यात येत असून, रणवीर सिंगला भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करूनच घरात प्रवेश दिला जात आहे.
हे ही वाचा:
मालाडमध्ये २२ फेब्रुवारीला शरीरसौष्ठवाचा थरार
भारत अमेरिका व्यापार करारात काही महत्त्वाचे बदल
एका कुटुंबातील पाच जणांची विष प्राशन करून आत्महत्या
गोवा विशेष: राज्याची संस्कृती डिजिटल होणार!
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शेट्टी यांच्या घरी ३१ जानेवारी रोजी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतरच रणवीर सिंगसह आयुष शर्मा यांनाही अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामागे शुभम लोनकर, आरजू बिश्नोई, हॅरी बॉक्सर आणि हरमन संधू यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, धमकी पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून उच्चस्तरीय सतर्कता ठेवण्यात येत आहे.







