अहमदाबादमधील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संतापलेल्या दिल्लीतील एका युवकाने तिचा आणि तिच्या आईचा सायबर छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दोघींचे १०० हून अधिक बनावट नग्न फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईम शाखेने उत्तर-पूर्व दिल्लीतील २७ वर्षीय सुमित नेमचंद शर्मा याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ दरम्यान हा सायबर छळ सुरू होता. आरोपीने संबंधित इन्फ्लुएन्सरच्या नावाने अनेक बनावट इन्स्टाग्राम खाती आणि यूट्यूब चॅनेल तयार करून त्यावर एआय-निर्मित आक्षेपार्ह सामग्री अपलोड केली होती. अहमदाबाद सायबर क्राईम ब्रँचचे एसीपी हार्दिक मनकडिया यांनी सांगितले की, “एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने तक्रार दिली होती की, अज्ञात व्यक्ती तिच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाती तयार करून तिचे आणि तिच्या आईचे एआयद्वारे तयार केलेले नग्न फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करत आहे. तांत्रिक तपास आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.”
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुमित शर्मा हा इस्कॉनच्या हरे कृष्ण पंथाशी संबंधित असून सोशल मीडियावर धार्मिक प्रवचनांचे व्हिडिओ अपलोड करत असे. त्याने सर्वप्रथम इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संबंधित इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधला होता. सुरुवातीला त्यांच्यात धर्म आणि अध्यात्म यासंदर्भात चर्चा होत होती. मात्र, आरोपीने मैत्रीचा प्रस्ताव दिल्यानंतर महिलेने तो नाकारला. त्यानंतर आरोपीने तिचा ऑनलाइन पाठलाग सुरू केला आणि तिचे फोटो वापरून बनावट सोशल मीडिया खाती तयार केली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, आरोपीने इन्स्टाग्रामवरून महिलेचे आणि तिच्या आईचे फोटो डाउनलोड केले होते. त्यानंतर “एआय रिमूव्ह क्लोद्स टूल्स” सारख्या ऑनलाइन साधनांचा वापर करून फोटो मॉर्फ करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गूगलवर अशा एआय टूल्सचा शोध घेत विविध वेबसाइट्सवर फोटो अपलोड केले आणि त्यातून बनावट नग्न फोटो व व्हिडिओ तयार केले. ही सामग्री नंतर बनावट इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स (X) आणि यूट्यूब खात्यांवरून प्रसारित करण्यात आली.
हे ही वाचा:
नीट फेरपरीक्षेवर पंतप्रधान कार्यालय ठेवणार नजर
खंडणी, मारहाणीच्या आरोपांनंतर जहांगीर खानच्या निकटवर्तीय नेत्याला अटक
पश्चिम बंगालमध्ये ‘लक्ष्मी भंडार’ योजनेचा लाभ घेणाऱ्या रकीबुल शेखला अटक
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
आरोपीच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत त्याने संबंधित महिलेच्या नावाने १० पेक्षा अधिक बनावट सोशल मीडिया खाती तयार केल्याचे समोर आले आहे. या खात्यांचा वापर करून अनेक महिन्यांपासून सातत्याने आक्षेपार्ह सामग्री अपलोड केली जात होती. या प्रकारामुळे संबंधित महिला आणि तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला असून सार्वजनिक अपमानालाही सामोरे जावे लागले, असे पोलिसांनी सांगितले. सुमित शर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८(२) आणि ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
