मुंबई गुन्हे शाखेने बनावट स्टॅम्प पेपर रॅकेटचा पर्दाफाश करत ६२.३८ लाख रुपयांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, जप्त करण्यात आलेले बनावट स्टॅम्प पेपर नेमके कुठून आणले गेले याचा तपास सुरू आहे. गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ८ ला खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती मुंबई विमानतळ परिसरात बनावट स्टॅम्प पेपर विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले.
चौकशीत आरोपीने आपले नाव रोहित जाधव असल्याचे सांगितले. त्याने हे बनावट स्टॅम्प पेपर नरेंद्र अहिरे याच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्र अहिरे यालाही अटक केली.
हे ही वाचा:
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक
पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कट उघड
व्हिएतनाम विमानतळावर भारतीय पर्यटकांचा गरबा
कॅनडामध्ये गुजराती विद्यार्थिनीची निर्घृण हत्या
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी मोठमोठ्या कर्जांची व्यवस्था करून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होते. कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत ते अर्जदारांकडून स्टॅम्प पेपरच्या नावाखाली पैसे उकळत होते. या बनावट स्टॅम्प पेपरवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची किंमत छापण्यात आली होती.
आरोपी कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींची बनावट स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रे तयार करत आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी त्यांना दिल्लीला जाण्यास सांगत. प्रवासादरम्यान कागदपत्रांची बॅग चोरीला गेल्याचे नाटक करून कर्ज प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगून ते फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
रोहित जाधव हा अंबरनाथ येथील रहिवासी असून नरेंद्र अहिरे हा नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील रहिवासी आहे. या संपूर्ण बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यामागे नरेंद्र अहिरे हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे.







