पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा भागात पोलिसांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता जहांगीर खान याचा निकटवर्तीय इसराफिल चकदार याला खंडणी उकळणे, धमकावणे आणि मारहाण यांसह अनेक आरोपांखाली अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी उशिरा रात्री फाल्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाशिमनगर परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. इसराफिल चकदार हा बंगानगर-२ ग्रामपंचायतीचा तृणमूल काँग्रेस प्रमुख आहे.
२९ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बंगानगर-२ ग्रामपंचायतीतील हाशिमनगर भागात स्थानिक महिलांनी सलग दोन दिवस आंदोलन केले होते, ज्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. आंदोलन करणाऱ्या महिलांचा आरोप होता की, इसराफिल चकदारच्या नेतृत्वाखाली तृणमूल समर्थक गुंडांनी त्यांना मतदान करण्यापासून रोखले. मतदानाच्या दिवशी महिलांना घराबाहेर पडू दिले नाही, असा त्यांचा दावा होता. तसेच इसराफिलवर महिलांशी मारहाण आणि छेडछाड केल्याचेही आरोप करण्यात आले.
या आंदोलनांनंतर फाल्टा येथे पुनर्मतदानाची मागणी करण्यात आली होती. इतर अनेक तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने फाल्टा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द केली होती. त्यानंतर २१ मे रोजी संपूर्ण फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्यात आले. या फेरमतदानात भाजप उमेदवार देबांग्शू पांडा यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर तृणमूलचे उमेदवार जहांगीर खान चौथ्या स्थानावर राहिले आणि त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पोलिस इसराफिल चकदारचा शोध घेत होते. बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली असून गुरुवारी डायमंड हार्बर एसीजेएम न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी पोलिसांनी जहांगीर खानचा आणखी एक निकटवर्तीय मानला जाणारा तृणमूल कामगार संघटनेचा नेता नासिर शेख यालाही अटक केली होती. फाल्टा विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) एका कारखान्यातील कामगारांकडून खंडणी उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये ‘लक्ष्मी भंडार’ योजनेचा लाभ घेणाऱ्या रकीबुल शेखला अटक
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले
भारत- चीन यांच्यात सीमा चर्चा; काय होते मुद्दे?
नासिर शेखवर कामगारांना योग्य वेतन न देणे, त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुली करणे आणि पैसे न दिल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देणे असे गंभीर आरोप आहेत. मंगळवारी कामगारांनी त्याच्याविरोधात जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली. तृणमूल नेत्यांच्या सलग अटकसत्रामुळे आता जहांगीर खान यांच्यावर पुढील कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यांना देण्यात आलेले संरक्षण काढून घेतले असून तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, फेरमतदानाच्या आदल्या दिवसापासून जहांगीर खान बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.







