चेंबूरमध्ये गॅस टँकरला वेल्डिंग करताना स्फोट

चालकाचा मृत्यू, दोघे जखमी

चेंबूरमध्ये गॅस टँकरला वेल्डिंग करताना स्फोट

चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंद नगर परिसरात आज शुक्रवारी सायंकाळी एका रिकाम्या गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. टँकरला वेल्डिंगचे काम सुरू असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, वेल्डिंग कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, परिसरातील अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५.०० च्या सुमारास मुकुंद नगरमधील डी-१/२ एचपीसीएल इमारतीजवळील एका वेल्डिंग गॅरेजमध्ये गॅस टँकर (क्रमांक MH 43 Y 8562) दुरुस्तीसाठी आणला होता. टँकर रिकामा असताना त्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. याच दरम्यान टँकरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या जिजामाता नगर आणि मैसूर कॉलनी परिसरातील नागरिक घाबरून बाहेर आले. स्फोटाच्या धक्क्याने परिसरातील इमारतींना हादरे बसले असून घरांच्या आणि गाड्यांच्या काचांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने, टँकर रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा जीवितहानीचा आकडा मोठा असू शकला असता.

हे ही वाचा:

श्रीकृष्णाला चोरण्याचा प्रयत्न !

रोजच्या या सवयी ठरत आहेत कोलेस्टेरॉल वाढीचे कारण

सिंधूची सेमीफायनलमध्ये दिमाखात एंट्री

फायनलपूर्वी स्पेनची धाकधूक! यामल-पोरोच्या फिटनेसने वाढवली चिंता

अपघाताची माहिती मिळताच आरसीएफ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या दोघा वेल्डरना त्वरित उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरसीएफ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, गॅरेज मालकावर सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version