अमरावती जिल्ह्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिंगोरी गावात बेकायदेशीर धर्मांतराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पैशांचे आमिष दाखवून आणि भीतीचे वातावरण निर्माण करून गावकऱ्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केरळसह विविध ठिकाणांहून आलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
३० डिसेंबरच्या रात्री ही घटना घडल्याने काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता; मात्र सध्या परिस्थिती शांत आहे. खबरदारी म्हणून गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आनंदकुमार बेंजामिन कारी (नागपूर), सुधीर विल्यम जॉन विल्यम (केरळ), जेल फादर चमन काला (केरळ), विक्रम गोपाळ सांड (तिवसा) तसेच चार महिला यांचा समावेश आहे.
पांढऱ्या कपड्यांत येऊन धर्मांतरासाठी चिथावणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगोरी येथील रहिवासी लक्ष्मण देविदास शेले यांनी ३० डिसेंबर रोजी बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, गावातील रितेश शंकरराव बोंडे यांच्या घरी काही बाहेरगावचे लोक आले होते. त्यापैकी एक व्यक्ती पांढऱ्या कपड्यांत होती. त्या व्यक्तीने गावकऱ्यांशी ख्रिश्चन धर्माबाबत चर्चा सुरू केली आणि पैशांचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गावात तणाव निर्माण झाला.
हे ही वाचा:
हाय-डोस निमेसुलाइड औषधांवर बंदी
या जीवनसत्त्वाची कमतरता लवकर वृद्धत्व आणू शकते
कर्जाच्या वादातून घाटकोपरमध्ये महिलेचा गळा चिरला
तात्काळ कारवाई, सर्व आरोपी अटकेत
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मुख्य आरोपी रितेश शंकरराव बोंडे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर उर्वरित सात आरोपींची ओळख पटवून त्यांनाही अटक करण्यात आली.
सर्व आरोपींविरोधात BNS कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना वरूड न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणाचा पुढील तपास बेनोडा पोलीस करत आहेत.
घटनेनंतर गावात शांतता राखण्यात आली असली तरी, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निगराणी वाढवण्यात आली आहे.
जबरी धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर धर्मांतर, आमिष दाखवणे किंवा दबाव टाकणे सहन केले जाणार नाही. नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी स्पष्ट केले आहे.
