अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटवर मोठा घाव घालत न्यूझीलंडला कुरिअरद्वारे पाठविण्यात येणारे १०.९९० किलो इफेड्रिन जप्त केले आहे. या प्रकरणी चेन्नईतील एस. हमीद याला अटक करण्यात आली असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात अमली पदार्थ पाठविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
एनसीबी मुंबईला चेन्नईमधून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय इफेड्रिन तस्करी रॅकेटची गोपनीय माहिती मिळाली होती. या टोळीतील सदस्य मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत जाऊन बनावट ओळखपत्रांच्या आधारे आंतरराष्ट्रीय कुरिअर बुक करून तपास यंत्रणांची दिशाभूल करत होते.
या माहितीच्या आधारे एनसीबीने २१ जुलै आणि २५ जुलै रोजी न्यूझीलंडला पाठविण्यात येणारी तीन संशयित कुरिअर पार्सल अडवली. पहिल्या दोन पार्सलमध्ये फ्लोअर मॅट्सच्या थरांमध्ये आणि कापडी रोलमध्ये ७ किलो इफेड्रिन अत्यंत चलाखीने लपविण्यात आले होते. तपासात या पार्सलसोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर तपासाची सूत्रे चेन्नईतील त्रिप्लिकेन परिसरापर्यंत पोहोचली. तेथे छापा टाकून एस. हमीद याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पॅकिंग साहित्य, डिजिटल वजनकाटा, हीट सीलिंग मशीन, प्लास्टिक पिशव्या, बनावट ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. त्याला २३ जुलै रोजी अटक करून मुंबईत आणण्यात आले.
हे ही वाचा:
एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..
एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..
भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा!
चौकशीदरम्यान हमीदने आणखी एका पार्सलबाबत माहिती दिली. त्यानुसार २५ जुलै रोजी कल्याण जिल्ह्यात हे पार्सल अडवण्यात आले. या पार्सलमध्ये बेडशीट आणि फोटो फ्रेमच्या थरांमध्ये ३.९९० किलो इफेड्रिन लपवून ठेवण्यात आले होते.
एनसीबीच्या माहितीनुसार, इफेड्रिन हे नियंत्रित रसायन (Controlled Substance) असून त्याचा मर्यादित वैद्यकीय वापर केला जातो. मात्र, याच रसायनाचा वापर मेथॅम्फेटामाइन या अत्यंत घातक आणि व्यसनाधीन अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे या इफेड्रिनचा स्रोत, त्यामागील मुख्य सूत्रधार आणि टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
एनसीबीने नागरिकांना अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास ‘मानस’ (MANAS) राष्ट्रीय अमली पदार्थ हेल्पलाइन १९३३ वर माहिती देण्याचे आवाहन केले असून, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
