माहीम कॉजवे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या केटीएम दुचाकीने रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला आणि दुचाकीस्वार अशा दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी माहीम पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी मृत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास मंगला अशोक तांडेल या आपल्या दोन मुलींसह माहीम कॉजवे येथून जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या होत्या. त्याचवेळी एमएच-०५-डीजे-४८१० क्रमांकाची केटीएम दुचाकी भरधाव वेगाने आली आणि मंगला तांडेल यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर महिला आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मंगला तांडेल यांना तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री सुमारे १०.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेला केटीएम चालक ध्रुव मनोज गुरव (वय २१) यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा:
वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!
प्रियांका वड्रा-शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जुंपली
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
मृत महिलेचे पती अशोक तांडेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहीम पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रियाज मेहबूब मुजावर करत आहेत.
