वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!

पोलिसांनी काढली परिसरातून धिंड

वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!

वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात दुकानदारांना आणि पादचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या एका गुंडाची पोलिसांनी धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. नौशाद उर्फ चुहा असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ज्या परिसरात त्याने गुन्हेगारी कृत्य केले होते, त्याच परिसरातून पोलिसांनी त्याची धिंड काढली.

रविवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण वडाळा परिसर हादरून गेला होता. नौशादने रात्रीच्या सुमारास एका दुकानात घुसून दुकानदाराला चाकूचा धाक दाखवला आणि मोबाईल फोनसह एकूण २२ हजार रुपयांची रोकड व मालमत्ता लूटमार करून पोबारा केला होता. एवढेच नव्हे, तर पळून जाण्याच्या मार्गात त्याने तिघा पादचाऱ्यांनाही अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सततच्या प्रकारामुळे स्थानिक दुकानदार आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामध्ये नौशाद अत्यंत निर्ढावलेपणाने कृत्य करताना स्पष्ट दिसत होता.

हे ही वाचा:

विरोधकांच्या गदारोळात ‘सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक २०२६’ संसदेत सादर

जपानमध्ये ७.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

बेबी पावडर वादावर जॉन्सन अँड जॉन्सनचा ५.५ अब्ज डॉलरच्या तडजोडीचा प्रस्ताव

हॉटेलातील पार्टीवरून वांगचुक यांनी कोक्रॉचना सुनावले

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी त्याला त्याच भागात आणत त्याची धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले आहे.

Exit mobile version