बनावट आधारकार्डसह नागरिकत्वाचे दस्तऐवज बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चौघांना अटक

बनावट आधारकार्डसह नागरिकत्वाचे दस्तऐवज बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट आधारकार्डसह जन्म दाखले, रहिवासी दाखले, शाळा-महाविद्यालय सोडल्याचे दाखले आणि भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दहिसर आणि कांदिवली परिसरातील आधार केंद्रांवर केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे आणि ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.

पोलिस उपनिरीक्षक निलेश साळुंखे यांना ४ ऑगस्ट रोजी दहिसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी दहिसर पूर्वेतील विद्यामंदिर शाळेजवळील ‘यूएस एंटरप्रायझेस’ येथे बनावट ग्राहक पाठविला. त्याला कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर येथील ‘सॅम इन्फोटेक आधार सेंटर’मध्ये पाठविण्यात आले. तेथे पैसे घेऊन बनावट आधारकार्ड तयार करण्याची तयारी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
हे ही वाचा:
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आता रशियाच्या बाजूने लढणार

सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’! सिंडारोववर दमदार विजय

भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे सोसायट्यांचे मुद्रांक शुल्क घटले

कांदा-लसूण-आल्याने बजेट बिघडवलं! जुलैमध्ये महागाई ४.४५%

या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ बनावट जन्म दाखले जप्त केले. तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के असलेले कोरे दाखले, बोटांचे ठसे असलेले दोन शिक्के, संगणक, सीपीयू, की-बोर्ड, माऊस, प्रिंटर, आधार अपडेट मशीन, आयरिस स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वेबकॅम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात सूरजकुमार रामचंद्र यादव आणि उपेंद्र कप्तान सिंह (३९) यांना अटक करण्यात आली असून, उमेश राजेश यादव ऊर्फ समीर हा आरोपी फरार आहे. दरम्यान, तपासादरम्यान कांदिवली पूर्वेतील पोयसर परिसरातील ‘शिवम एंटरप्रायझेस’ या आणखी एका आधार केंद्राची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे छापा टाकला असता १४ बनावट जन्म दाखले, सात बनावट रहिवासी दाखले, २६ बनावट एसबीआय वैद्यकीय विमा पॉलिसी आणि तीन बनावट नागरिकत्व प्रमाणपत्रांच्या प्रती आढळून आल्या.

या कारवाईतही संगणक, प्रिंटर, आधार अपडेट मशीन, आयरिस स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वेबकॅम आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सत्यम लालान मिश्रा (३३) आणि आकाश भगवान पटवा (२४) यांना अटक करण्यात आली.

दहिसर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकुमार मीना, पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि सहायक पोलिस आयुक्त जयराज रणपावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिस तपास सुरू आहे.

Exit mobile version