ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाच्या मुसक्या आवळल्या

१५ हजारांत ४ ग्रॅम एमडी घेताना कॉन्स्टेबल अटकेत

ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान पोलिसांचाच एक कर्मचारी ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडला गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. किरण इंदुलकर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून तो सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी तो मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मालवणी परिसरातील ड्रग्ज व्यवहाराच्या संशयावरून तो तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.

मालवणी पोलिसांना गेट क्रमांक ८ परिसरात अमली पदार्थांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत एका पोलिस कर्मचाऱ्यालाच ड्रग्ज विक्रेत्याच्या भूमिकेत उभे केले. याच ठिकाणी किरण इंदुलकर पोहोचला आणि त्याने १५ हजार रुपये देऊन चार ग्रॅम एमडी म्हणजेच मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती आहे. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले आणि पोलिसांनाही धक्का बसला.
हे ही वाचा:
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा एअर स्ट्राइक; २१ जणांचा मृत्यू

न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप सिद्ध, घरात सापडली होती प्रचंड रोकड

इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; सोनं १० आठवड्यांच्या उच्चांकावर

इंदुलकर याच्याबाबत यापूर्वीही तक्रारी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला ताकीद देऊन बदली करण्यात आली होती, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याचा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काही व्यक्तींशी संपर्क आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कथित ड्रग्ज कनेक्शनचा तपास आता अधिक गांभीर्याने केला जात आहे.

या प्रकरणात न्यायालयाने किरण इंदुलकर याला पोलीस कोठडी सुनावली असून मालवणी पोलीस पुढील तपास करत आहेत. ड्रग्ज व्यवहारामागे त्याचे आणखी कोणाशी संबंध होते का, या नेटवर्कमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती आणि यापूर्वीही त्याचा अशा व्यवहारांमध्ये सहभाग होता का, याचा तपास केला जात आहे. पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभाग आढळल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि दलाच्या प्रतिमेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Exit mobile version