भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मधील शास्त्रज्ञ असल्याचे भासवणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदच्या वर्सोवा येथील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यात ‘अति संवेदनशील’ कागदपत्रे मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अख्तर हुसेनच्या घरात अणुबॉम्बच्या डिझाइनशी संबंधित १४ अत्यंत संवेदनशील नकाशे सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अख्तर हुसेन सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर विभागाकडून (IB) त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याचा नेमका मनसुबा काय होता याबाबत तपास यंत्रणांकडून अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. या प्रकरणाला “अत्यंत राष्ट्रीय महत्त्व” म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
बनावट ओळखपत्र आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका
जप्त केलेल्या नकाशांची सत्यता आणि बारकाईने तपासणी करण्यासाठी तांत्रिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की, यातील काही नकाशे अंधेरी येथील एका स्थानिक दुकानातून छापले गेले होते, ज्यामुळे ही माहिती कशी मिळवली आणि पुनरुत्पादित केली गेली याबद्दल गंभीर चिंता वाढली आहे.
अधिकाऱ्यांनी अख्तरचे छायाचित्र असलेले ‘अली रझा होसेनी’ या नावाचे बनावट BARC ओळखपत्र देखील जप्त केले आहे. हे बनावट ओळखपत्र खरे ओळखपत्राशी इतके मिळतेजुळते होते की, ते ओळखणे कठीण झाले असते. या ओळखपत्राचा वापर करून अख्तरने BARC कॅम्पसमधील प्रतिबंधित भागात प्रवेश मिळवला असावा किंवा संवेदनशील प्रतिमा कॅप्चर केल्या असाव्यात, असा तपास यंत्रणांना संशय आहे.
वर्सोवा येथील छाप्यात अनेक बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तसेच अनेक मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत. डिजिटल पुरावे मिळवण्यासाठी हे सर्व साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगावर आरोप म्हणजे संविधानाचा अपमानच!
‘इराणी अणु सुविधा नष्ट झालेल्या नाहीत, स्वप्ने पाहत राहा’
बिहार : मुद्रित जाहिरातींसाठी कडक मार्गदर्शक सूचना
हाय ब्लड प्रेशर आयुर्वेद, योग्य जीवनशैलीने करा नियंत्रित
पत्नी आणि मुलाची चौकशी; आरोपीचा जुना रेकॉर्ड….
अख्तर हा वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलासह राहत होता. आता तपास यंत्रणा त्यांचीही कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, अनेक केंद्रीय एजन्सी आरोपींच्या संबंधांची आणि त्याच्या कारवायांची संयुक्तपणे चौकशी करत आहेत.
प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, ६० वर्षीय आरोपीला यापूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे ‘सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे’ आणि ‘अधिकृत गुपिते कायद्याचे उल्लंघन’ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सध्या तो त्या प्रकरणात जामिनावर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ पासून अख्तरवर पाळत ठेवण्यात आली होती. त्यावेळी त्याला अरब राजनयिकांना भारतीय अणुगुपिते विकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. तेव्हा त्याच्याकडे वर्गीकृत डेटा उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले नसले तरी, बनावटगिरी आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती.
