इंजिनिअरिंगसाठी प्रवेशाचे आमिष दाखवणारी टोळी उद्ध्वस्त

पुण्यातील दोन 'बोगस कॉल सेंटर', १० जणांना अटक

इंजिनिअरिंगसाठी प्रवेशाचे आमिष दाखवणारी टोळी उद्ध्वस्त

नामांकित शिक्षण संस्थांमध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून देशभरातील अनेक विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पवई पोलिसांनी पुणे येथील दोन बोगस कॉल सेंटरवर धाड टाकून १० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ३५ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील एका महिलेच्या मुलाला आयआयआयटी (IIIT) हैदराबाद येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी त्यांच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचे लोकेशन पुण्यातील विमाननगर आणि खराडी भागात असल्याचे समजले.

हे ही वाचा:

मदरशाच्या नावाखाली दहशतवादाला फंडिंग; जैशशी संबंधित एकाला अटक

बँक खाते भाड्याने देणं पडलं महागात; २५ कोटींचे व्यवहार उघड

विकसित भारतासाठी बँकिंगचा ‘मेगाप्लॅन’

नंबर-३ साठी टीम इंडियात महासंग्राम!

त्यानुसार, १४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी विमाननगर आणि खराडी येथील दोन ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणी आरोपी नामांकित शिक्षण संस्थांच्या नावाखाली बोगस कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी २०१९ पासून या धंद्याद्वारे अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

हे आरोपी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेच्या काळात इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संपर्क साधत. त्यानंतर बोगस सिम कार्डचा वापर करून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांची विश्वासार्हता निर्माण करत. काही प्रकरणांत ते थेट शैक्षणिक संकुलात जाऊन पालकांसमोर स्वतःची ओळख प्रशासन विभागातील अधिकारी अशी करून देत असत. यामुळे पालक विश्वासात येऊन त्यांना टोकन अमाऊंट किंवा पहिल्या वर्षाची फी रोख स्वरूपात किंवा बँक खात्यात भरत असत.

पोलिसांनी या कारवाईत एकूण १० जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २२ मोबाईल, २३ सिम कार्ड, एक लॅपटॉप, ७ डेबिट कार्ड, २ आलिशान मोटारी आणि बँक खात्यातील २४ लाख रुपये असा एकूण १ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या टोळीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात अशा विविध राज्यांमध्ये ६ गुन्हे केल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींकडून पीआयसीटी (PICT), एनसयूटीआय (NSUTI) आणि डीटीयू (DTU) यांसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांची यादीही सापडली आहे. यामुळे येत्या काळात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही कारवाई पवई पोलिसांच्या विशेष पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली आहे.

Exit mobile version