बँक खाते भाड्याने देणं पडलं महागात; २५ कोटींचे व्यवहार उघड

बिहारमध्ये तिघांना अटक

बँक खाते भाड्याने देणं पडलं महागात; २५ कोटींचे व्यवहार उघड

सायबर फसवणुकीत वापरण्यासाठी स्वतःची बँक खाती भाड्याने देणाऱ्या तिघांना पाटणा पोलिसांनी अटक केली आहे. या खात्यांमधून तब्बल २५ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सायबर फसवणुकीच्या प्रत्येक व्यवहारासाठी आरोपींना ३ हजार ते ५ हजार रुपये दिले जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रभाकर, अमित आणि दीपक अशी आहेत. यापैकी दोघे रॅपिडो बाईक-टॅक्सी चालक म्हणून काम करतात. तिसरा आरोपीही सायबर फसवणूक करणाऱ्या नेटवर्कला बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचा आरोप आहे. पाटणा आणि बिहारमधील बक्सर येथून या तिघांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींची बँक खाती आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटकडून ‘म्युल अकाउंट’ म्हणून वापरली जात होती. ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा करून पुढे इतर खात्यांमध्ये वळवली जात होती. या तिघांविरोधात अनेक राज्यांतील पीडितांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर (NCRP) तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी संबंधित बँक खात्यांचा माग काढला आणि आरोपींपर्यंत पोहोचल्याचे पाटणा सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी डीएसपी संगीता कुमारी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सोरेन सरकार झुकलं; JSSC-CGLसह TDPLच्या परीक्षा रद्द

हिंद महासागरावर भारताचा ‘ड्रोन वॉच’; नौदलाला मिळणार MQ-9B सी गार्डियनची ताकद

भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव

झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा

या प्रकरणात पोलिसांनी केवळ तीन आरोपींवर कारवाई करून तपास थांबवलेला नाही. २५ कोटी रुपयांच्या व्यवहारांमागे नेमके कोण आहेत आणि ही रक्कम कोणत्या सायबर फसवणुकीतून आली, याचा तपास सुरू आहे. तसेच आणखी किती जणांनी आपली बँक खाती सायबर गुन्हेगारांना भाड्याने दिली आहेत आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये त्यांची भूमिका काय आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे या कारवाईतून बिहारमधील सायबर फसवणुकीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version