भारत-नेपाळ सीमेवरील सोनौली तपासणी नाक्यावर बनावट भारतीय ओळख निर्माण केल्याच्या आरोपावरून थायलंडच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. भारतात प्रवेश करताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या वर्तनावर आणि भाषेवरून संशय आला. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात तिच्याकडे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कथित बनावट कागदपत्रे आढळून आली.
इमिग्रेशन कार्यालयात नेपाळहून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू असताना ही महिला अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. तिने तपासणीवेळी थायलंडचा पासपोर्ट आणि व्हिसा सादर केला. मात्र, तिच्या बोलण्यावरून अधिकाऱ्यांना काहीतरी संशयास्पद वाटले. चौकशी केल्यानंतर तिची ओळख चोन चुतिचिराफत, थायलंडची नागरिक अशी पटली.
तिच्या मोबाइलची तपासणी केली असता ‘करुणा रुपनी देवी दासी’ या नावाने तयार करण्यात आलेल्या कथित भारतीय कागदपत्रांच्या डिजिटल प्रती मिळाल्या. या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्डचा समावेश असल्याचे समोर आले. या कागदपत्रांवर मथुरेतील वैष्णव नगर, रमनरेती येथील पत्ता नमूद असल्याचे तपासात आढळले. याशिवाय तिच्याकडे थायलंडचा मूळ पासपोर्टही होता. पोलिसांच्या चौकशीत महिलेच्या भारतातील वास्तव्याबाबतही माहिती समोर आली आहे. २००५ मध्ये तिचे थायलंडमध्ये नेपाळी नागरिक मित्रलाल खनाल याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर २००६ मध्ये ती पतीसोबत भारतात आली. त्यानंतर हे दाम्पत्य मथुरेत भाड्याच्या घरात राहत होते.
२०११ मध्ये त्यांनी मथुरेत जमीन खरेदी करून स्वतःचे घर बांधल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यानंतर थायलंडच्या या महिलेने भारतीय नागरिक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी कथित बनावट कागदपत्रे तयार करून घेतल्याचा आरोप आहे. महिलेची दोन मुले असून नंदनी २० वर्षांची, तर नीरज १८ वर्षांचा आहे. दोघेही मथुरेत राहून शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवणार
दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन
५ हजार पोलिस, ३० हजार आंदोलक…तरीही अतिरिक्त बळाचा वापर नाही!
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात चंपत राय यांना क्लीन चिट
दरम्यान, महिला १९ मे २०२६ रोजी नेपाळला गेली होती. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी ती भारतात परतत असताना सोनौली सीमेवर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. यावेळी बनावट भारतीय कागदपत्रांचे प्रकरण समोर आले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर महिलेला सोनौली पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्याविरोधात बनावट ओळख निर्माण करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
