सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिच्या अडचणी कमी होत नसून दिवसेंदिवस तिचा पाय अधिक खोलात जात असताना दिसत आहे. या प्रकरणात पोलिस सध्या तिची चौकशी करत आहेत. दरम्यान, तिचे सावत्र वडील डीजीपी के रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी पोलिस महासंचालक (कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळ) के रामचंद्र राव यांच्या सक्तीच्या रजेचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात त्यांना रजेवर पाठवण्याचे कोणतेही विशिष्ट कारण देण्यात आलेले नाही. आयपीएस अधिकारी सध्या कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात.
३ मार्च रोजी दुबईहून परतताना रान्या राव हिला बंगळूरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. अभिनेत्रीला मदत करणाऱ्या प्रोटोकॉल अधिकाऱ्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले होते की त्याने डीजीपी राव यांच्या विशेष सूचनांनुसार हे केले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी विशेष न्यायालयाला माहिती दिली की, तपासात आतापर्यंत सोन्याच्या तस्करीसाठी एक अत्याधुनिक पद्धत असल्याचे उघडकीस आले आहे, ज्यामध्ये सुरक्षेला बगल देऊन राज्य पोलिस प्रोटोकॉल ऑफिसरचा वापर करणे, सोने खरेदी करण्यासाठी भारतातून दुबईला निधी हस्तांतरित करण्यासाठी हवाला व्यवहारांमध्ये गुंतणे आणि मोठ्या सिंडिकेटचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.
रान्या राव हिच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना, आयपीएस अधिकाऱ्याने स्वतःला तिच्या अटकेपासून दूर ठेवले होते. तसेच कृतीवर दुःख व्यक्त केले होते. त्यांनी दावा केला होता की, त्यांना तिच्या तस्करीच्या कारवायांमध्ये सहभागाची माहिती नव्हती, तिच्या अटकेची माहिती त्यांना मीडिया रिपोर्ट्सवरूनच मिळाली, कारण ती अलिकडेच लग्न झाल्यानंतर वेगळी राहत होती. तथापि, केम्पेगौडा विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबलने डीआरआय अधिकाऱ्यांना सांगितले की तो फक्त रामचंद्र राव यांच्या थेट आदेशांचे पालन करत आहे.
हे ही वाचा :
हौथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करत ट्रम्प यांचा इशारा; हल्ला केला तर अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कतालची पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या
विराट कोहली आरसीबी संघात सामील
मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी…
कर्नाटक सरकारने १० मार्च रोजी अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांची नियुक्ती केली. रामचंद्र राव यांच्या सावत्र मुलीच्या कथित सोन्याच्या तस्करीत त्यांची काही भूमिका असेल तर त्यांची चौकशी करावी. विमानतळावरील पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सरकारने सीआयडी चौकशीचे आदेशही दिले होते. तथापि, आदेश पारित केल्यानंतर काही तासांतच हा आदेश मागे घेण्यात आला.







