जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने मोठी कारवाई करत आपल्या पुरवणी आरोपपत्रात पाकिस्तानस्थित दहशतवादी हाफिज सईद याला आरोपी केले आहे. लष्कर-ए-तोयबा आणि त्याची सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) यांचा प्रमुख आणि संस्थापक म्हणून हाफिज सईदची ओळख आहे. एनआयएने सोमवारी (६ जुलै) जम्मू येथील विशेष न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात हाफिज सईदवर वैयक्तिकरित्या तसेच बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचा प्रमुख म्हणून गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
तपास संस्थेच्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ आणि बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA), १९६७ अंतर्गत विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट, सीमापार दहशतवादी कारवायांचे षड्यंत्र रचणे आणि दहशतवादी हल्ल्यांना पाठबळ देणे, असे गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
हे पुरवणी आरोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या १,५९७ पानांच्या सविस्तर आरोपपत्रानंतर सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये पाकिस्तानचा कट, हाफिज सईदची भूमिका तसेच एनआयएने केलेल्या वैज्ञानिक तपास आणि घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
यापूर्वी १५ डिसेंबर २०२५ रोजी एनआयएने या प्रकरणातील पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये पाकिस्तानातील हँडलर साजिद जट्ट याला आरोपी करण्यात आले होते. तसेच जुलै २०२५ मध्ये ‘ऑपरेशन महादेव’ दरम्यान ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचा आणि अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला होता. एनआयएने लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या संघटनांनाही या हल्ल्याचा कट रचणे, त्याला पाठिंबा देणे आणि तो अंमलात आणणे यासाठी जबाबदार धरले आहे.
हे ही वाचा:
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!
सॉफ्टवेअर कंपनी SAP ने भरती थांबवली; AI वर करणार लक्ष्य
‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळ्याने भारतीयांना ४,०५७ कोटींचा फटका
अमरनाथ यात्रा २०२६: तीन दिवसांत ५६ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हा भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य करत २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाची हत्या केली होती. या घटनेनंतर पहलगाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला. सध्या एनआयए या संपूर्ण कटाचा तपास करत असून, सीमापार बसून भारतात दहशतवादाला चालना देणाऱ्या पाकिस्तानमधील सूत्रधारांचा आणि त्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
