भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास

भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणलेल्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि अवैध घुसखोरी प्रकरणात लखनौ येथील एनआयए/एटीएस विशेष न्यायालयाने १५ दोषींना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येक दोषीला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारतात आणणे, त्यांच्यासाठी बनावट भारतीय कागदपत्रे तयार करणे आणि त्यांना भारतीय नागरिक म्हणून ओळख मिळवून देण्याच्या कामात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर २०२१ रोजी या प्रकरणात प्रथम कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी मिथुन मंडल, पिंटू दास उर्फ शाओन अहमद, रोनी पाल उर्फ मोहीनूर इस्लाम, बाबी राय उर्फ मेहंदी हसन, विक्रम सिंह, महफूजुर रहमान, समीर मंडल उर्फ टोनी आणि मोहम्मद जमील उर्फ हरीश उल्लाह यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे आणि अवैध घुसखोरीशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले होते.

पुढील तपासात या रॅकेटचे धागेदोरे देशाच्या सीमांपलीकडे पोहोचल्याचे समोर आले. असीदिलु इस्लाम उर्फ विजय दास, हुसेन मोहम्मद फहद उर्फ मानिक दत्ता, अल अमीन अहमद उर्फ राजेश विश्वास, जैबुल इस्लाम उर्फ गोविंदा दास, जमील अहमद उर्फ लाश विश्वास पोराम, राजीब हुसेन उर्फ अजीत दास, सखावत खान उर्फ गोलक मंडल, अलाउद्दीन तारिक उर्फ रिकू विश्वास, अजय घिल्डियाल, नूर अमीन, खोखन सरदार उर्फ कय्यूम सिकदर आणि रतन मंडल यांचाही या टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या सर्वांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

तपासादरम्यान या रॅकेटची कार्यपद्धतीही उघड झाली. आरोपी भारत-बांगलादेश सीमेवरून बांगलादेशी नागरिकांना गुप्तपणे भारतात आणत होते. त्यानंतर त्यांच्यासाठी बनावट आधार कार्ड, ओळखपत्रे आणि इतर सरकारी कागदपत्रे तयार करून त्यांना भारतीय नागरिक असल्याचे भासवले जात होते. एवढेच नव्हे, तर या बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देऊन त्यांना इतर देशांमध्ये पाठवण्याचाही प्रकार सुरू असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले.

संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सादर करण्यात आलेले पुरावे आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादाच्या आधारे एनआयए/एटीएस विशेष न्यायालयाने १५ आरोपींना अवैध घुसखोरी, बनावट कागदपत्रांचा वापर आणि मानवी तस्करीच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले.

हे ही वाचा:

दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले

थायलंडमध्ये सापडली २ हजार वर्षे जुनी भारतीय ब्राह्मी लिपी असलेली सोन्याची अंगठी

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

न्यायालयाने महफूजुर रहमान, खोखन सरदार उर्फ मोहम्मद कय्यूम अन्सारी, जमील अहमद उर्फ पोराम उर्फ लाश विश्वास, अलाउद्दीन तारिक उर्फ रिकू विश्वास, हुसेन मोहम्मद फहद उर्फ मानिक दत्ता, सखावत खान उर्फ गोलक मंडल, अल अमीन अहमद उर्फ राजेश विश्वास, असीदिलु इस्लाम उर्फ विजय दास, जैबुल इस्लाम उर्फ गोविंदा दास, राजीब हुसेन उर्फ अजीत दास, मोहीनूर इस्लाम उर्फ रोनी पाल, मेहंदी हसन उर्फ बाबी राय, शाओन अहमद उर्फ पिंटू दास, नूर अमीन आणि मोहम्मद जमील उर्फ हरीश उल्लाह यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या १५ दोषींमध्ये १३ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या नागरिकांचा समावेश आहे. एटीएसने ही कारवाई भारतातील अवैध घुसखोरी, बनावट कागदपत्रांचे रॅकेट आणि मानवी तस्करीच्या संघटित जाळ्यावर मोठा आघात असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version