गर्भवती असल्यामुळे टीसीएस धर्मांतरणातील मुख्य आरोपी निदा खानला जामीन

दानिश शेखचा अर्ज फेटाळला

गर्भवती असल्यामुळे टीसीएस धर्मांतरणातील मुख्य आरोपी निदा खानला जामीन

टीसीएस धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला नाशिक रोड न्यायालयाने सहआरोपी तौसिफ खान याच्यासह जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातील आणखी एक आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

टीसीएस नाशिकमधील हिंदू महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यांनी, ७ मे रोजी निदा खानला अटक करण्यात आली होती. यापूर्वी तिचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) विरोधानंतरही निदा खानचा जामीन मंजूर केला. सरकारी वकील जय मिसार यांनी माध्यमांशी बोलताना जामीन मंजूर झाल्याची पुष्टी केली. निदा खानने गर्भवती असल्याच्या कारणावरून जामिनाची मागणी केली होती.

दानिश शेखचा जामीन अर्ज फेटाळला

न्यायालयाने दानिश शेखचा जामीन अर्ज फेटाळताना त्याच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद केले. न्यायालयाच्या आदेशानुसार, उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीचा प्रथमदर्शनी सहभाग दिसून येतो. पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी फरार होऊ शकतो. साक्षीदारांना धमकावणे किंवा भावनिक दबाव टाकण्याची शक्यता आहे. पीडितेवर झालेला मानसिक परिणामही गंभीर आहे.

या कारणांमुळे न्यायालयाने दानिश शेखला जामीन देण्यास नकार दिला. हे प्रकरण नाशिकमधील देवळाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आले आहे.

एफआयआरमध्ये काय म्हटले आहे?

एफआयआरनुसार, जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दानिश, तौसिफ आणि निदा यांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्या. दानिश शेखवर आरोप आहे की, विवाहाचे आमिष दाखवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आधीपासून विवाहित असतानाही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हे ही वाचा:

आमची माती, आमची माणसं आणि आमचा पैसा…

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

सावधान! पाकिस्तानी ‘गोरी’सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक

१३ देशांची माघार, भारत खामेनींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित

तौसिफवर आरोप आहे की, त्याने कार्यस्थळी फिर्यादीचा विनयभंग केला. वारंवार लैंगिक संबंधांची मागणी केली. दानिशसोबतचे संबंध तिच्या कुटुंबाला सांगण्याची धमकी दिली.

निदा खानची कथित भूमिका

न्यायालयाच्या आदेशानुसार, निदा खानने इतर आरोपींसह फिर्यादीला भीती दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादीला बुरखा उपलब्ध करून दिला. इस्लाम धर्माशी संबंधित पुस्तके, व्हिडिओ, युट्यूब दुवे, इन्स्टाग्राम दुवे आणि रिल्स पाठवले. तिच्या मोबाईलमध्ये इस्लामशी संबंधित ऍप इन्स्टॉल केले. स्वतःच्या घरी नमाज कशी अदा करावी, हिजाब आणि बुरखा कसा परिधान करावा याचे मार्गदर्शन केले.

फिर्यादीने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, तिला वारंवार पाकिस्तानी धर्मगुरू तारिक जमील यांचे व्हिडिओ आणि झाकीर नाईक यांची भाषणे पाहण्यास सांगितले जात होते, जेणेकरून तिच्या धार्मिक विचारांवर प्रभाव पडावा.

मलेशिया कनेक्शनचीही चौकशी

पोलीस निदा खानच्या मलेशिया कनेक्शनची देखील चौकशी करत आहेत. तपासानुसार, निदा खानने फिर्यादीला मलेशियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. न्यायालयीन आदेशात दानिश शेख आणि तौसिफ यांनी फिर्यादीला इमरान नावाच्या व्यक्तीकडे मलेशियाला पाठवण्याचा कट रचल्याचा उल्लेख आहे.

इतर आरोपी

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये, शफी बिखान शेख, रझा रफीक मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ आफताब अन्सारी यांचा समावेश आहे.

रझा रफीक मेमन, जो टीम लीडर होता, त्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याशिवाय, वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध पाठलाग, छळ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. महिला तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पॉश समितीच्या ऑपरेशन्स मॅनेजर अश्विनी चैनानी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version