बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण त्याचा आगामी चित्रपट नाही तर त्याची गुंतवणूक आहे. देशातील आघाडीच्या फिटनेस आणि वेलनेस प्लॅटफॉर्म Cult.fit च्या बहुप्रतीक्षित आयपीओपूर्वी ऋतिक रोशन आपल्या मालकीतील ६.३३ लाख इक्विटी शेअर्स विकणार आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मधून ही माहिती समोर आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ऋतिक रोशन कंपनीतून पूर्णपणे बाहेर पडत नाही. शेअर्स विकल्यानंतरही त्याच्याकडे कंपनीतील मोठा हिस्सा कायम राहणार आहे. त्यामुळे ही विक्री म्हणजे गुंतवणुकीतून अंशतः नफा वसूल करण्याची (Partial Monetisation) रणनीती मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत ऋतिक रोशन हा Cult.fit चा ब्रँड अॅम्बेसेडर आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक राहिला आहे.
Cult.fit चा प्रस्तावित आयपीओ ₹३,५०० ते ₹४,००० कोटींच्या आकाराचा असू शकतो. या इश्यूमध्ये कंपनी ₹९५० कोटींचे नवीन शेअर्स (Fresh Issue) जारी करणार असून त्यासोबत ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विद्यमान भागधारकांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकले जाणार आहेत. या OFS मध्ये ऋतिक रोशनसह अनेक प्रारंभीचे गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.
हे ही वाचा:
लेप्टोस्पायरोसिसपासून बचावासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ऍडव्हायझरी
रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्याला ‘हनीमून बेडरूम’चा लूक
पीओके पुन्हा पेटणार? पाकिस्तान सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम
घसरणीनंतर बाजाराची दमदार मुसंडी; सेन्सेक्स २३८ अंकांनी वधारला
कंपनीला नव्या शेअर्समधून मिळणारा निधी नवीन फिटनेस सेंटर्स सुरू करणे, विद्यमान केंद्रांचा विस्तार, कर्जफेड, ब्रँड मार्केटिंग आणि Cultsport व्यवसाय वाढवण्यासाठी वापरला जाणार आहे. दुसरीकडे, OFS मधून मिळणारी रक्कम थेट शेअर्स विकणाऱ्या भागधारकांकडे जाणार असून ती कंपनीच्या तिजोरीत जमा होणार नाही.
देशभरातील फिटनेस उद्योग झपाट्याने वाढत असताना Cult.fit ने सार्वजनिक बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत ऋतिक रोशनचा अंशतः एक्झिट हा केवळ आर्थिक व्यवहार नसून, कंपनीवरील त्याचा दीर्घकालीन विश्वास कायम असल्याचा संदेशही मानला जात आहे. आता या मेगा आयपीओचा प्राइस बँड आणि लिस्टिंगला गुंतवणूकदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे.







