राज्यातील कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर अन्न व औषध प्रशासनाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आतापर्यंतची सर्वात मोठी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी टाकलेल्या धाडीत सुमारे १.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आले असून २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळीच्या रसायनांच्या पुरवठ्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर या रॅकेटचा तपास सुरू करण्यात आला. तपासात स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांच्या मिश्रणातून कृत्रिम दूध तयार करून ते नैसर्गिक दुधात मिसळून विक्री होत असल्याचे उघड झाले. या संपूर्ण रॅकेटचा प्रमुख सूत्रधार मंचर येथील सुशांत बाबनराव हिंगे असल्याचे तपासात समोर आले.
मुख्य आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ आणि ५ जुलै रोजी १३ दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर आणि संबंधित आस्थापनांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, उपकरणे, व्यवहाराची कागदपत्रे आणि अन्य वैज्ञानिक पुरावे जप्त करण्यात आले. एकूण ४९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून संबंधित पाच अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
सुप्रिया सुळे म्हणतात, महाराष्ट्रात आणीबाणी घोषित करा!
इंडोनेशियात पंतप्रधान मोदींचे स्वागत; लढाऊ विमानांनी दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि इतर राज्यांशी असलेले संबंध यांचाही तपास केला जात आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, दूधासारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थात रासायनिक पदार्थ मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. भेसळीच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेऊन अशा संघटित रॅकेटचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी राज्यभर गुप्तवार्तेवर आधारित कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
