अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील बेलव्ह्यू शहरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने भारतीय समुदायाला हादरवून सोडले आहे. तेलंगणातील ३० वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अविनाश नार्ने याच्यावर स्वतःच्या पत्नीची पूर्वनियोजित हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, जवळपास नऊ महिन्यांच्या सखोल तपासानंतर त्याच्यावर प्रथम श्रेणीतील हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे आणि न्यायवैद्यकीय अहवालामुळे हे प्रकरण संशयास्पद मृत्यूपासून थेट खुनाच्या गुन्ह्यात रूपांतरित झाले आहे.
मृत राजिथा सब्बिनेनी (२७) हिचा मृतदेह ऑक्टोबर २०२५ मध्ये पती-पत्नी राहत असलेल्या अपार्टमेंटमधील बाथरूममध्ये आढळला होता. त्यावेळी अविनाशने पोलिसांना पत्नीने बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला असून ती प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता राजिथा बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला हा संशयास्पद मृत्यू मानला गेला, मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि हा खून असल्याचे निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला, २० जण अडकले
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण
ना तारीख, ना सुनवाई ४ दिवसात फैसला…
बेंगळुरूत सरळ रस्त्यावर नागमोडी ‘स्पीडब्रेकर’मुळे रहदारी थांबली
त्यानंतर सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी मोबाईल डेटा, इलेक्ट्रॉनिक डोअर लॉक रेकॉर्ड, कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप संदेशांची तपासणी केली. या तपासातून घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये अविनाश व्यतिरिक्त अन्य कोणीही प्रवेश केल्याचा पुरावा मिळाला नाही. याशिवाय, अविनाशचे भारतातील एका महिलेसोबत गुप्त प्रेमसंबंध असल्याचेही तपासात उघड झाले. पत्नीच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्याने त्या महिलेला राजिथाच्या मृतदेहाचा फोटो पाठवल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
तपास अधिक खोलवर गेल्यानंतर पोलिसांना इंटरनेटवरील संशयास्पद शोध, घटनेच्या सुमारास भारतातील महिलेसोबत झालेले वारंवार फोन कॉल आणि काही डिजिटल पुरावे मिळाले. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, हे सर्व पुरावे खून पूर्वनियोजित असल्याकडे निर्देश करतात. राजिथाने मृत्यूपूर्वी पतीने बनवलेल्या पेयाची चव औषध किंवा कफ सिरपसारखी लागत असल्याची तक्रार केल्याचाही उल्लेख तपासात करण्यात आला आहे.
अविनाश नार्ने याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर प्रथम श्रेणीतील हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो ५० लाख डॉलर्स (सुमारे ४८ कोटी रुपये) इतक्या जामिनावर कोठडीत आहे. वॉशिंग्टन राज्याच्या कायद्यानुसार दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक पुराव्याची बारकाईने छाननी करत आहे.







