नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले

नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले

वांद्रे पश्चिम परिसरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असलेल्या एका २२ वर्षीय तरुणीने वाहतूक पोलिसांच्या कारवाईला हिंसक विरोध करत थेट कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तरुणीसह तिच्या मित्राविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर हल्ला करणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

१९ जून रोजी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास वांद्रे येथील के.सी. रोडवरील एनजीसी कॉलनी परिसरात वाहतूक पोलिसांनी विशेष नाकाबंदी केली होती. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात ही कारवाई सुरू असताना, पोलिसांनी एका कारला थांबवून चालकास ब्रेथ ऍनालायझर चाचणी करण्यास सांगितले. मात्र, गाडी चालवणारी २२ वर्षीय तरुणी चाचणी देण्यास टाळाटाळ करत पोलिसांशी वाद घालू लागली.

काही वेळाच्या वादानंतर पोलिसांना तिची चाचणी घेण्यास यश आले, ज्यात मद्यप्राशनाचे प्रमाण स्पष्ट झाले. दरम्यान, याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या तिच्या मित्राचीही चाचणी केली असता, तोही मद्यधुंद असल्याचे समोर आले. दोघेही एकमेकांचे परिचित असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संतापलेल्या तरुणीने एका पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धक्का दिला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर तिने त्या कर्मचाऱ्याचे केस ओढले आणि नखांनी ओरबाडून त्याला जखमी केले.

हे ही वाचा:

१० लाख रुपयांना बाळांची विक्री; १३ जण अटकेत

कोलकाता विमानतळावर तृणमूल-भाजपचे कार्यकर्ते भिडले

राजीव बलियान असल्याचे सांगितले…निघाला अशफाक, विधवेला ओढले जाळ्यात

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रयागराजमध्ये ‘जल योग’

पोलिसांनी तात्काळ ताबा मिळवत दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. तिथेही त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर हल्ला करणे या गंभीर आरोपांखाली दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version