१० लाख रुपयांना बाळांची विक्री; १३ जण अटकेत

दिल्ली पोलिसांकडून आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

१० लाख रुपयांना बाळांची विक्री; १३ जण अटकेत

दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असून, गेल्या दीड वर्षात सुमारे ३० बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कथित तस्कर, मध्यस्थ, खरेदीदार आणि एका खासगी रुग्णालयाच्या मालकासह १३ जणांना अटक करण्यात आली असून, पाच अर्भकांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, राजस्थान आणि गुजरातमधील आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधून नवजात आणि लहान मुलांना कमी पैशांत मिळवून त्यांची दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील निःसंतान जोडप्यांना विक्री केली जात होती. ही बाळे १० ते २० हजार रुपयांत मिळवली जात होती, तर बनावट जन्मदाखले आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे त्यांची ६ ते १० लाख रुपयांपर्यंत विक्री केली जात होती.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये पुरवठादार, वाहतूकदार आणि मध्यस्थांची साखळी कार्यरत होती. संभाव्य खरेदीदार शोधण्यासाठी खासगी रुग्णालये आणि प्रजननक्षमतेशी संबंधित संपर्कांचा वापर केला जात होता. गेल्या १८ महिन्यांत या टोळीने सुमारे ३० मुलांची तस्करी केल्याचा संशय असून, त्याबाबतचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, टोळीने अत्यंत संघटित पद्धतीने काम करण्याची व्यवस्था उभी केली होती. असुरक्षित आणि गरीब कुटुंबांमधून लहान मुलांना मिळवून त्यांना बनावट ओळखपत्रांच्या आधारे विविध राज्यांतील खरेदीदारांच्या ताब्यात दिले जात होते. या प्रकरणाचा उलगडा ५ जून रोजी पहाडगंज येथील आरके आश्रम मेट्रो स्थानकाजवळ पोलिसांनी रचलेल्या सापळ्यानंतर झाला. चार ते पाच दिवसांच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर झालेल्या छापेमारीत आणखी आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फ्रीलान्स लॅब टेक्निशियन, चालक, घरगुती कामगार तसेच बाह्य दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या मालकाचाही समावेश आहे. या सर्वांनी बालकांना आश्रय देणे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

कोलकाता विमानतळावर तृणमूल-भाजपचे कार्यकर्ते भिडले

राजीव बलियान असल्याचे सांगितले…निघाला अशफाक, विधवेला ओढले जाळ्यात

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रयागराजमध्ये ‘जल योग’

पॅरिसमधून मोदींचा डिजिटल मास्टरस्ट्रोक!

दरम्यान, या रॅकेटमधील प्रमुख पुरवठादार सायबाभाई घमर उर्फ कालिया याला १७ जून रोजी गुजरातमधून अटक करण्यात आली. पोलिस आता सुटका करण्यात आलेल्या बालकांच्या जैविक पालकांचा शोध घेत असून, या टोळीमार्फत विक्री झालेल्या इतर अर्भकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाल कल्याण समितीने सुटका करण्यात आलेल्या पाच अर्भकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या देखभाल आणि पुनर्वसनासाठी आवश्यक आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे देशभर पसरलेल्या एका संघटित मानवी तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून, तपास यंत्रणा आता या रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यात व्यस्त आहेत.

Exit mobile version