टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयातून ६.५ लाख रुपयांच्या आयपीएल २०२५ च्या जर्सी चोरीला गेल्याचे वृत्त आहे. या चोरीमागे ४० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा हात होता आणि त्याला या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, फारुख अस्लम खान असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याने २६१ जर्सी चोरल्या होत्या, ज्या प्रत्येकी किंमत सुमारे २५०० रुपये होती.
पोलिसांनी सांगितले की, ऑनलाइन गेमिंगच्या नादामुळे गार्डने त्या जर्सी चोरल्या. जरी त्या जर्सी वेगवेगळ्या संघांच्या होत्या, तरी त्या खेळाडूंसाठी होत्या की जनतेसाठी हे निश्चित माहिती नाही. सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या हरियाणातील एका ऑनलाइन डीलरला गार्डने या जर्सी विकल्या.
१३ जुलै रोजी स्टोअर रूममधून स्टॉक गायब असल्याचे दिसून आले तेव्हा ही चोरी उघडकीस आली. त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये गार्ड एका बॉक्समध्ये जर्सी घेऊन निघून जाताना आढळून आला. “आरोपी गार्डचा दावा आहे की त्याने ऑनलाइन डीलरशी थोडीशी सौदेबाजी केली, परंतु त्याने अद्याप या डीलसाठी किती पैसे मिळाले हे स्पष्ट केलेले नाही,” असे एका पोलिस सूत्राने TOI ला सांगितले.
जर्सी कुरिअरने ऑनलाइन डीलरकडे पाठवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी त्यालाही चौकशीसाठी हरियाणाहून बोलावण्यात आले आहे. “ऑनलाइन डीलर म्हणतो की त्याला जर्सी चोरीला गेल्याची माहिती नव्हती, ऑफिसमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने जर्सी ‘स्टॉक क्लिअरन्स सेल’चा भाग आहेत असे गार्डने सांगितले, असे एका पोलिस सूत्राने सांगितले.
हे ही वाचा :
‘ऑपरेशन महादेव’: दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!
पुतीन यांच्याकडे ५० नाहीतर केवळ १२ दिवस नाहीतर निर्बंधांना सामोरे जा!
भारत बनला अमेरिकेचा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार
चोरीला गेलेल्या २६१ जर्सींपैकी ५० जर्सी सापडल्या आहेत. गार्डने सांगितले की त्याला ऑनलाइन डीलरकडून पैसे थेट त्याच्या खात्यात मिळाले. त्याने असेही सांगितले कि मिळालेले सर्व पैसे तो ऑनलाइन गेमिंगमध्ये गमावून बसला. दरम्यान, गार्डच्या दाव्यानंतर पोलीस त्याच्या बँक खात्याचे तपशील तपासत आहेत. या प्रकरणी बीसीसीआयने १७ जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात चोरीची अधिकृत तक्रार दाखल केली होती.







