कॉमेडियन आणि अभिनेते कपिल शर्मा यांच्या कॅनडातील नव्याने सुरु झालेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर शुक्रवारी कॅफेच्या टीमकडून प्रतिक्रिया आली असून त्यांनी हार न मानण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नवीन ‘कप्स कॅफे’ कॅनडाच्या सरे, ब्रिटिश कोलंबिया येथे स्थित आहे, जिथे हा गोळीबार झाला. या हल्ल्यात नऊ राउंड फायरिंग करण्यात आली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.
खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेमुळे कॅफेची टीम हादरली आहे, पण त्यांनी हार न मानण्याचा निर्णय घेतला आहे.
कप्स कॅफेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक निवेदन जारी करताना म्हटलं आहे, “आम्ही या कठीण काळातून जात आहोत, परंतु आमचे स्वप्न चालू ठेवणार आहोत. कॅफे सुरू करण्याचा उद्देश लोकांना एकत्र आणणे आणि समुदायाची भावना वृद्धिंगत करणे हा आहे. आम्ही हे तसेच टिकवू इच्छितो. लोकांच्या पाठिंबा आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत. तुमच्या प्रेमळ संदेशांनी आणि पाठिंब्याने आम्हाला बळ दिलं आहे. हा कॅफे तुमच्या विश्वासामुळेच आहे. चला, हिंसेच्या विरोधात एकत्र येऊ आणि कप्स कॅफेला प्रेमाचं स्थान बनवू.”
हे ही वाचा:
भाजपने टी राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!
…हा तर बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना घातलेला लगाम
लॉर्ड्समधलं गौरवस्थान: सचिन तेंडुलकरचं चित्र एमसीसी संग्रहालयात झळकणार!
कॅफेने सरे पोलीस आणि डेल्टा पोलीस यांच्या त्वरित कारवाईबद्दलही आभार मानले आहेत.
कपिल शर्माच्या पत्नी गिन्नी चतरथ या कॅफेची जबाबदारी सांभाळत आहेत. काही दिवसांपूर्वीच कपिलने सोशल मीडियावर कॅफेच्या आतल्या भागाच्या झलकाही शेअर केल्या होत्या, ज्यात इंटिरिअर अतिशय आकर्षक दिसत होता. कॅफेचं मेन्यूसुद्धा खास असून त्यात स्पेशल कॉफी बरोबरच लेमन पिस्ता केक, फज ब्राउनी आणि क्रोइसाँ सारखे चविष्ट डेझर्ट्स आहेत.
कपिल शर्माने ७ जुलै रोजी ‘कॅप्स कॅफे’चं उद्घाटन केलं होतं. हल्ला १० जुलैच्या मध्यरात्री झाला. कॅफेवर ९ गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोराने या हल्ल्याचा व्हिडिओ देखील शूट केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.







