वांद्रे पूर्व येथील १३व्या मजल्यावरून उडी मारून २४ वर्षीय कायद्याच्या पदवीधर तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर दोन महिला त्याला पोलिसात अडकवण्याची धमकी देत असल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता, असा आरोप त्याच्या आईने केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण वांद्रे पूर्व येथे आई-वडील आणि धाकट्या भावासोबत राहत होता. त्याने कायद्याचे शिक्षण घेतले होते. यापूर्वी तो एका न्यायाधीशांकडे विधी लिपिक म्हणून काम करत होता. सध्या तो घरून काम करीत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावग्रस्त असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले होते.
६ ऑगस्ट रोजी तरुणाच्या दोन मित्रांनी त्याच्या आईला फोन करून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती दिली. बंगळूर येथे शिक्षण घेत असताना तरुणाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर संबंधित महिला आणि तिची मोठी बहीण तरुणाला धमकावत असल्याचे मित्रांनी त्याच्या आईला सांगितले.
हे ही वाचा:
जुनेदची बिर्याणी झारखंडमध्ये का चालली नाही ?
ब्रिक्सच्या स्वतंत्र चलनाला भारताचा स्पष्ट विरोध
अरुणाचलमध्ये उल्फा-आयच्या चार कॅडरचे आत्मसमर्पण
यानंतर आईने मुलाकडे याबाबत विचारणा केली असता, त्याने धमक्या मिळत असल्याचे आणि त्यामुळे आपण मानसिक तणावाखाली असल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी महिलांपैकी एकीने तरुणाच्या धाकट्या भावाच्या मोबाईलवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आई आपल्या मुलाच्या मित्राशी फोनवर बोलत असतानाच तरुणाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले. काही वेळाने दरवाजा उघडत नसल्याने आईने चालकाला डुप्लिकेट चावी आणण्यास सांगितले. मात्र, चालकाने घराबाहेर मोठी गर्दी जमल्याचे आणि तरुणाने १३व्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारल्याचे तिला सांगितले.
तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर त्याच्या आईने खेरवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
