पुणे जिल्ह्यात मे २०२६ मध्ये विषारी दारू प्राशनामुळे २१ जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह संपूर्ण टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २७ ते ३० मे २०२६ दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत मिथेनॉल मिसळलेली हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने हडपसरमधील चार आणि दापोडी-फुगेवाडी परिसरातील १७ अशा एकूण २१ जणांचा मृत्यू झाला होता.
सीआयडीच्या तपासात मुख्य आरोपी दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याने आकाश दीपक जाधव, योगेश राजेंद्र व्हनकडे, राधेश्याम हरिराम प्रजापती, कल्पेश अशोक अग्रवाल, आर्यन संजीव धोत्रे, अभिषेक अरुण चौबे, अरुण जगदंबा चौबे आणि अंकित अरुण चौबे यांच्यासह संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणे, तिची वाहतूक आणि विक्री करून मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.
सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, या टोळीच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुणे जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. टोळीच्या प्रमुखासह सदस्यांविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नव्हती.
यामुळे या संघटित गुन्हेगारी नेटवर्कवर प्रभावी आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक शामराव काळे यांनी सर्व पुरावे आणि गुन्हेगारी नोंदींची पडताळणी करून पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे-पश्चिम) सुधीर हिरेमठ यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर सुधीर हिरेमठ यांनी दत्ता लोंढे आणि त्याच्या साथीदारांवर मकोका लागू करण्यास मंजुरी दिली.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले
उपोषण सोडण्यासाठी राहुल गांधींकडून प्रतिसादच मिळाला नाही!
लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी
‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी प्रकरणात सलमान खानसह बहिणीला समन्स
अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. २१ जणांचा बळी गेलेल्या या भीषण प्रकरणात मकोका लागू झाल्याने संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
