केंद्र सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातलेली असतानाही, मुंबईत चोरट्या मार्गाने पाकिस्तानी बनावटीचे सौंदर्यप्रसाधन विकले जात असल्याचे उघड झाले आहे. चेंबूरमधील एका कॉस्मेटिक्सच्या दुकानातून पाकिस्तानमध्ये उत्पादित ‘गोरी ब्युटी क्रीम’ (Goree Beauty Cream) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूरमधील ‘टोनी लँड’ या कॉस्मेटिक्सच्या दुकानात पाकिस्तानी बनावटीची उत्पादने विक्रीसाठी ठेवली असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-६ ला मिळाली होती. त्यानुसार, २३ जून रोजी पोलिसांनी सापळा रचला. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला ‘डिकॉय’ (बनावट ग्राहक) म्हणून दुकानात पाठवून खात्री करण्यात आली. महिला कॉन्स्टेबलने ‘गोरी ब्युटी क्रीम विथ लायकोपीन’ची मागणी करताच दुकानदाराने ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. त्यानंतर पोलीस पथकाने दुकानावर छापा टाकला.
हे ही वाचा:
४३ कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
आईस्क्रीम घेण्याच्या नादात बाल्कनीवरून कोसळला युवक
साई सुदर्शनचे श्रीलंकेत दमदार शतक
पंतप्रधान मोदी जाणार सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर
छाप्यादरम्यान दुकानातून ५ नगांचे ‘गोरी ब्युटी क्रीम’ जप्त करण्यात आले. या उत्पादनाच्या पाकिटावर ‘मेड इन पाकिस्तान’ असे नमूद असून, त्यावर उर्दू भाषेतील मजकूर आहे. तसेच या उत्पादनाची किंमत ४९९ रुपये असल्याचे दिसून आले. यातील एक नमुना रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे, तर उर्वरित चार नमुने पुरावा म्हणून जप्त केले आहेत.
दुकानाचा मालक संजय मणिलाल शाह (वय ५२) याच्याकडे या मालाची कोणतीही अधिकृत खरेदी पावती नव्हती. चौकशीदरम्यान, हे क्रीम मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील एका व्यापाऱ्याकडून विकत घेतल्याची कबुली त्याने दिली आहे.
केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) २ मे २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी आहे.
याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात संजय शाह विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि २२३, तसेच परराष्ट्र व्यापार (विकास आणि नियमन) कायदा १९९२ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा १९४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा माल पुरवणाऱ्या मुख्य साखळीचा शोध पोलीस घेत आहेत.
