४३ कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

४३ कोटींची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

महानगर गॅस लिमिटेडच्या (MGL) नावाखाली बनावट ‘APK’ फाईल पाठवून नागरिकांच्या मोबाईलचा ताबा घेणाऱ्या आणि करोडोंची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी झारखंड, बिहार आणि दिल्ली येथून एकूण सहा जणांना अटक केली आहे. या टोळीने देशभरातील ३,२०६ नागरिकांची तब्बल ४३ कोटी २५ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
एका तक्रारदाराला महानगर गॅसच्या नावाखाली बनावट संदेश पाठवून ‘MGL GAS UNBLOCK FILE.apk’ ही फाईल इन्स्टॉल करण्यास भाग पाडले होते. हे ॲप इन्स्टॉल करताच तक्रारदाराच्या मोबाईलमधील बँकिंग माहिती चोरून २ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. यावरून पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात एफआयआर

साई सुदर्शनचे श्रीलंकेत दमदार शतक

आईस्क्रीम घेण्याच्या नादात बाल्कनीवरून कोसळला युवक

पंतप्रधान मोदी जाणार सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर
मुंबई सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत बनावट APK डेव्हलपर, ते वितरित करणारे आणि पीडितांची फसवणूक करणारे अशा सहा आरोपींना झारखंड, बिहार व दिल्ली येथून अटक केली. अटक आरोपींमध्ये आरिफ अन्सारी, शेख बेलाल नौशाद, मेहबूब आलम, साजिद अली, मोहन महतो आणि सुनील सोरेन यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून ११ मोबाईल, १ लॅपटॉप आणि १११ बनावट APK फाईल्स जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, या टोळीच्या सर्व्हरमधून ८,६०९ पीडितांचे मोबाईल क्रमांक आणि त्यांची गोपनीय माहिती (बँक खाते, एटीएम पिन, सीव्हीव्ही) जप्त करण्यात आली आहे. तसेच, १.२४ कोटींहून अधिक एसएमएस रेकॉर्ड्सही पोलिसांच्या हाती लागले आहेत. या टोळीचा महाराष्ट्रातील ५१७ तर मुंबईतील ९३ तक्रारींशी थेट संबंध असल्याचे समोर आले असून, याबाबात अन्य राज्यांच्या पोलिसांना आणि ‘I4C’ ला कळवण्यात आले आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे:
* अनोळखी नंबरवरून आलेली कोणतीही APK फाईल किंवा ZIP फाईल इन्स्टॉल/एक्सट्रॅक्ट करू नका.
* आपला OTP, ATM पिन आणि बँकिंग माहिती कोणालाही सांगू नका.
* फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
ही कामगिरी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा शिंदे आणि त्यांच्या विशेष पथकाने केली आहे.

Exit mobile version