वरळी सी-लिंकवरून व्यापाऱ्याची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल

वरळी सी-लिंकवरून व्यापाऱ्याची आत्महत्या

व्यवसायातील आर्थिक नुकसान आणि त्यामुळे आलेल्या नैराश्याला कंटाळून एका ५१ वर्षीय व्यापाऱ्याने वरळी सी-लिंकवरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२६ जून) घडली. मृतकाचे नाव भावेश नवीनचंद्र मजेठिया असे आहे. समुद्राच्या रौद्र रूपामुळे बचावकार्यात सुरुवातीला अडथळे आले, मात्र अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमातून मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भावेश मजेठिया यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मंदिर परिसराबाहेरून टॅक्सी केली होती. ते वांद्रे येथे जाणार होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास टॅक्सी वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ पोहोचली असता, भावेश यांनी टॅक्सी चालकाकडे आपल्याला उलट्या होत असल्याचे सांगून गाडी थांबवण्यास सांगितले. चालकाने गाडी थांबवताच भावेश यांनी त्वरित खाली उतरून पुलावरून थेट समुद्रात उडी घेतली.

हे ही वाचा:

देशाच्या मोठ्या भागात ढग गायब, पण लवकरच…

भारताच्या परकीय चलनसाठ्यात जवळपास १ अब्ज डॉलरची भर

सोनं पुन्हा स्वस्त! चांदीतही मोठी घसरण

सेमीफायनलचे रणांगण तापले; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे महाआव्हान!

घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्यासाठी सागरी पोलिसांची मदत घेतली. मात्र, आज समुद्रात मोठी भरती आणि लाटांचे उधाण असल्याने स्थानिक मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवण्यास नकार दिला.

पोलिसांनी सागरी पोलिसांच्या ‘बोट क्रमांक ३’ची मदत मागितली, परंतु लाटांचा जोर इतका प्रचंड होता की बोटमध्ये पाणी शिरू लागल्याने ती पुन्हा येलो गेटकडे परतली.अखेर वरळी पोलिसांच्या विनंतीनंतर वरळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या रबरी लाईफ सेव्हिंग बोटच्या सहाय्याने धाडसी मोहीम राबवत दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृतदेह शोधून बाहेर काढला.

मयत भावेश मजेठिया हे ठाण्यातील श्रीनगर भागात राहत होते आणि त्यांचे घाटकोपर येथे कापडाचे दुकान होते. गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते मानसिक तणावात होते, असे त्यांचा मुलगा प्रथम मजेठिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Exit mobile version