सायबर गुन्हेगारीचे प्रमाण किती भयावह झाले आहे याचा मोठा धक्कादायक आकडा समोर आला आहे. देशभरात विविध ठिकाणी तब्बल ६० कोटी २९ लाख २८ हजार ९२१ रुपयांची फसवणूक या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटमार्फत करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत या रॅकेटमधील १२ जणांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेने कांदिवली (पूर्व) येथील सी.जी. ऑफिस कंपलेक्समधील बोगस कंपन्यांवर छापा टाकला. या कारवाईतून २ लॅपटॉप्स, ९ प्रिंटर्स, २५ मोबाईल फोन्स, १४७ सिमकार्ड्स, डेबिट कार्ड्स, चेकबुक्स, पॅनकार्ड्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कंपन्यांच्या माध्यमातून बनावट बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर करून पैसे परदेशी खात्यांमध्ये वळवले जात होते.
हे ही वाचा:
त्या मंत्र्यांनी सत्तेत नाही, तुरुंगात असले पाहिजे
भारताने गुंडाळले, नो फर्स्ट यूज धोरण?
हैदराबादच्या गणेशोत्सवात “ऑपरेशन सिंदूर” थीमवरील गणेशमूर्तीचं आकर्षण!
“ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याने मुंबईतील समीकरणं बदलणार नाहीत”
तपासात समोर आले की या रॅकेटने तब्बल १४३ बँक अकाऊंट्सचा वापर केला असून, त्यातून ९,६९,८४,८८४ रुपयांची उलाढाल झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच या रॅकेटविरोधात ३३ गुन्हे दाखल झाले असून, त्यातून अंदाजे १० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक उघड झाली आहे.
मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे देशभरात सायबर फसवणुकीचे जाळे किती प्रचंड प्रमाणात पसरले आहे, हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, आणखी आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.
