हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील फार्महाऊसमध्ये घरगुती मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने जेडीएसचे बडतर्फ नेते आणि माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रज्वल रेवण्णा यांना ११ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने सांगितले की, ही संपूर्ण रक्कम पीडितेला देण्यात येईल.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सायबर गुन्हे ठाण्यात दाखल झालेल्या या प्रकरणात रेवण्णावर दोन वेळा महिलेवर बलात्कार केल्याचा आणि कृत्य रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. यापूर्वी, शुक्रवारी (१ ऑगस्ट) प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आणि कोर्ट शनिवारी शिक्षेची सुनावणी करणार होते. आज अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावत प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा आणि ११ लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे.
प्रज्वल रेवण्णा यांनी न्यायाधीशांकडे कमी शिक्षा व्हावी अशी विनंती केली होती. ते न्यायालयात म्हणाले, “माझे एक कुटुंब आहे, मी सहा महिन्यांपासून माझ्या पालकांना पाहिले नाही. कृपया मला कमी शिक्षा द्या, हीच मी न्यायालयाला विनंती करतो.” गेल्या वर्षी मे महिन्यात जर्मनीहून आगमन होताच अटक झालेल्या प्रज्वल म्हणाले, “माझ्या आयुष्यात मी केलेली एकमेव चूक म्हणजे मी राजकारणात वेगाने प्रगती केली.”
दरम्यान, रेवण्णा यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(के) आणि ३७६(२)(एन) तसेच कलम ३५४(अ), ३५४(ब) आणि ३५४(क) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.







