महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील अल-कायदा प्रकरणाच्या तपासासंदर्भात मोठी कारवाई केली आहे. एटीएसच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा- कौसा परिसरातील एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकला. मुलांना आणि तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून या शिक्षकाची चौकशी सुरू आहे. इब्राहिम अबिदी, असे कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
इब्राहिम अबिदी हा मुंब्रा येथील कौसा परिसरात भाड्याने राहतो. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी ज्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता, तिथे छापा टाकण्यात आला. शिवाय, त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घराचीही एटीएसने झडती घेतली आहे. एटीएसला संशय आहे की, शिक्षक म्हणून काम करत असलेला अबिदी हा मुलांना आणि तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचे काम करत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एटीएसने ही कारवाई केली.
हे ही वाचा:
उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आता दहशतवादी कृत्यात आघाडीवर
फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित डॉक्टरांना कट्टर बनवणाऱ्या इमामला अटक
“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?
१९ ऑक्टोबरलाच लीड मिळाला होता…सिंदूर २.० चे संकेत; अल फलाहचा चेअरमनच दाखलेबाज
एटीएसने छापेमारी करत अबिदीच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ही उपकरणे तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. एटीएसची ही कारवाई पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पुणे आणि मुंबईतून काही संशयितांना अटक करण्यात आली होती, ज्यांचा संबंध अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी असल्याचे उघड झाले होते.
