शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताच शाकिब यांच्या घरावर हल्ला

घरावर दगडफेक करत पेट्रोल बॉम्ब फेकला

शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताच शाकिब यांच्या घरावर हल्ला

बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या मॅगुरा येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात घराचे नुकसान झाले असून ते पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, ही घटना शाकिब यांनी भारतात आयोजित माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आभासी पत्रकार परिषदेत सहभाग घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत घडली.

बुधवारी संध्याकाळी मॅगुरा जिल्ह्यातील शाकिब यांच्या निवासस्थानावर अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली आणि पेट्रोल बॉम्ब फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हल्ल्याची वेळ पाहता या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शाकिब अल हसन यांनी भारतातून आयोजित शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेत ऑनलाइन सहभाग घेतला होता. त्या परिषदेत शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाझेद जॉय आणि अवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेतेही सहभागी झाले होते. या सहभागानंतर काही तासांतच शाकिब यांच्या घरावर हल्ला झाल्याने या दोन्ही घटनांचा संबंध असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही.

हे ही वाचा:

ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

“बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनत आहे”

सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा

अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप

क्रिकेटमधील यशस्वी कारकिर्दीनंतर शाकिब अल हसन यांनी अवामी लीगमध्ये प्रवेश केला होता. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते मॅगुरा-१ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, शेख हसीना सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांचे संसदीय सदस्यत्व संपुष्टात आले. त्यानंतर ते राजकीयदृष्ट्या चर्चेत राहिले आहेत.

Exit mobile version