महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या लैंगिक शोषण आणि फसवणूक या प्रकरणात अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ११ गुन्ह्यांचा तपास थेट एसआयटीमार्फत केला जात आहे. यामध्ये ८ गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित ३ गुन्हे आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अवैध सावकारी अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. इतर तीन गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत, अशी माहिती या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पत्रकार परिषदेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या की, तपासादरम्यान आतापर्यंत ३० पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या आणि पीडितांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असे. “कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होईल” अशी भीती दाखवून, तसेच खडे, चिंचोके आणि रुद्राक्षाच्या माध्यमातून तो लोकांकडून पैसे उकळत होता. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचालाखीने चमत्कार दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे, अशी त्याची भयानक ‘मोडस ऑपरेंडी’ होती.
हे ही वाचा:
ऐन धुमश्चक्रीत भारत-इराणच्या सततच्या संवादाचे रहस्य काय?
धारावीत मध्यरात्री दुचाकींना आग
पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीसाठी अभूतपूर्व सुरक्षा
पश्चिम आशियातील तणावातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) व्याप्ती वाढवण्यात आली असून, एकूण २४ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असल्याची माहिती सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पीडित महिलांच्या गोपनीयतेबाबत अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले. तसेच जसे तपासात पुरावे समोर येतील, तसे अशोक खरातला गुन्ह्यांसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष तपास पथकामध्ये २ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक आणि ६ पोलीस अंमलदार अशा एकूण २४ जणांचा समावेश आहे. हे पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे खरातच्या गुन्ह्यांचे जाळे उलगडत आहे.
सायबर सेलने ४६५० लिंक केल्या डिलीट
पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि माहिती रोखण्यासाठी एसआयटीच्या सायबर टीमने मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावरील ४ हजार ६५० आक्षेपार्ह लिंक हटवण्यात आल्या असून, चिथावणीखोर पोस्ट टाकणारे ४५१ अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. तसेच, पीडितांचे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सातपूर (नाशिक) आणि कोपरगाव (अहिल्यानगर) येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
पीडितांची ओळख जपा
त्या म्हणाल्या, “महिला अत्याचाराच्यासंदर्भाने दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केल्यामुळे आपण कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. या महिलांनी लोक काय म्हणतील? या भीतीने अन्याय सहन केलेला आहे. आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्स मध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचे नैतिक कर्तव्य तर आहे.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचे धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचे आहे, असे आवाहन तेजस्वी सातपुते यांनी केले.”
पीडित महिलांनी अत्यंत धाडसाने पुढे येऊन तक्रारी दिल्या आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा राखणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे सातपुते यांनी अधोरेखित केले. भारतीय संविधानाचे अनुच्छेद २१ आणि बीएनएस कलम ७२ नुसार लैंगिक अत्याचार पीडितांची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा आहे. “पीडितांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करणे किंवा त्यांचे व्हिडिओ प्रसारित करणे हे केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीर आहे. अशा कृत्यांमुळे पीडितांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आणि नागरिकांनी ‘मीडिया ट्रायल’ टाळावी,” असे आवाहन त्यांनी केले.
बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे संकेत
या प्रकरणात काही बडे पदाधिकारी किंवा अधिकारी सहभागी आहेत का? या प्रश्नावर बोलताना तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले की, तपास हा पूर्णपणे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आहे. खरातच्या या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी इतर कुणी कारणीभूत ठरले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.







